File Photo : Security Alert
नवी दिल्ली : खलिस्तानी संघटना स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशात मोठा कट रचत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी देशभरात अलर्ट जारी केला आहे. 15 ऑगस्टला या संघटना दिल्लीत ठिकठिकाणी खलिस्तानी घोषणा असलेले पोस्टर लावणार असल्याचे समजते. दिल्ली पोलिसांना ‘टार्गेट किलिंग’ची माहितीही मिळाली आहे. गुप्त माहितीच्या आधारे दिल्ली पोलीस सतर्क झाले आहेत.
खलिस्तानवाद्यांच्या कारवायांमध्ये देशात वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत मेट्रोसह अनेक ठिकाणी खलिस्तानच्या समर्थनार्थ पोस्टर लावण्यात आले आहेत. कटाबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेतली. विशेष कक्षही सतर्क झाला आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी स्वातंत्र्यदिनी सतर्कता वाढवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
3 खलिस्तानींना पंजाबात अटक
पंजाब पोलिसांनी अलीकडेच कॅनडामध्ये बसलेल्या दहशतवादी लखबीर सिंग ऊर्फ लांडा याच्या तीन साथीदारांना अटक केली होती. लांडाचे साथीदार खंडणी नेटवर्क, शस्त्रास्त्रे, पाकिस्तानातून येणारे ड्रग्ज आणि इतर गुन्ह्यांमध्ये सामील होते.
गुन्हेगारीचे मोठे नेटवर्क
या तिघांचे कॅनडामध्ये लपून बसलेल्या लखबीर लांडासोबत संबंध आहेत. तिन्ही आरोपी संघटित गुन्हेगारी आणि खंडणीचे मोठे नेटवर्क चालवत होते. सर्व वस्तुस्थिती तपासल्यानंतर जालंधर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली.