धक्कादायक! ‘महादेव अ‍ॅप’ घोटाळ्यातील आरोपीच्या वडिलांचा मृत्यू, दोन दिवसापासून होते बेपत्ता

‘महादेव अ‍ॅप’ घोटाळ्यातील छत्तीसगडमधील आरोपी असीम दासच्या वडिलांचे निधन झाले आहे. गेल्या दोन दिवसापासून ते बेपत्ता होते. पोलिसांना एका गावात त्यांचा मृतदेह आढळला.

    गेल्या काही दिवसापासून ‘महादेव अ‍ॅप’ (Mahadev App) चांगलच चर्चेत आहे. या बेटिंग अ‍ॅपच्या घोटाळ्या अनेक बड्या हस्तींची नावं आल्यानं या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं आहे. नुकतचं या प्रकरणी आता तपासासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक स्थापन करण्यात आलं असून तपास वेगानं होईल. मात्र, या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. ‘महादेव अ‍ॅप’  घोटाळ्यातील आरोपीच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीचे वडील छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील एका गावात मृतावस्थेत आढळले. त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सुशील दास (६२) असं त्यांच नाव असून ते आरोपी असीम दासचे वडील आहेत.  प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा पोलिसांना संशय आहे.

    नेमका प्रकार काय?

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘महादेव बेटिंग अ‍ॅप’ प्रकरणी गेल्या अनेक दिवसापासुन तपास सुरू आहे. या प्रकरणी मुख्यत्वे प्रवर्तक सौरभ चंद्राकारचं नाव समोर आलं. त्यानतंर तपासा दरम्यान, असीम दास आणि अन्य आरोपी भीम सिंह यादव यांना 3 नोव्हेंबर रोजी EDI ने अटक केली होती. मृत सुशील दास हे आरोपी असीम दासचे वडील आहेत. फॉरेन्सिक तपासणीत असीम दास कॅश कुरिअर म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे 508 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे समोर आले आहे. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे.

    मुंबई पोलिसांच विशेष पथक स्थापन

    “महादेव अ‍ॅप’ प्रकरणातील आरोपींविरोधात कलम 420, 465, 467, 120 बी, 12 जुगार प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान द्याच्या कलम 66 (क), 66 (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक स्थापन करण्यात आल्याने लवकरच याप्रकरणातील खरी माहिती समोर येईल.