File Photo : Arvind Kejriwal
नवी दिल्ली : मद्यधोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात असतानाच त्यांच्या सरकारमधील एका मंत्र्याने बुधवारी राजीनामा दिला आहे. केजरीवाल यांच्या गैरहजेरीत समाजकल्याण मंत्री राजकुमार आनंद यांनी राजीनामा दिल्याने आम आदमी पार्टीला जोरदार धक्का बसला आहे.
पटेलनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले आनंद यांनी पत्रपरिषद घेऊन ही माहिती दिली. मंत्रिपदासोबतच त्यांनी पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. जाटव समुदायाचे नेते असलेल्या आनंद यांनी दिल्ली विधानसभेच्या 2020च्या निवडणुकीत 61 टक्के मते घेतली होती. पक्षात दलित समुदायाला योग्य स्थान मिळत नसल्याचा आरोपही आनंद यांनी केला आहे.
दिल्लीचे मंत्री राजकुमार आनंद बऱ्याच काळापासून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) निशाण्यावर होते. त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर नोव्हेंबर 2023 मध्ये ईडीने छापेही टाकले होते.
भ्रष्टाचारावरून घणाघात
भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी झाला, परंतु तुमच्यावर होत असलेले आरोप पाहून व्यथित झालो आहे. राजकारण बदलले तरच देश बदलेल. त्यामुळे पदाचा राजीनामा देत आहे.
– राजकुमार आनंद, मंत्री, दिल्ली.