Karnataka Politics: कर्नाटकात नव्या राजकीय पर्वाची सुरुवात! डी. के. शिवकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
Karnataka Politics: कर्नाटकच्या राजकारणात आज एका नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष D. K. Shivakumar यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. लोक भवन येथील ग्लास हाऊसमध्ये आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल Thawar Chand Gehlot यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
६४ वर्षीय शिवकुमार यांच्या शपथविधीसह कर्नाटकातील नेतृत्व हस्तांतरणाची प्रक्रिया औपचारिकरीत्या पूर्ण झाली. माजी मुख्यमंत्री Siddaramaiah यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाने शिवकुमार यांची नेतेपदी निवड केली होती.
शपथविधी सोहळ्यास काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डी. के. शिवकुमार यांच्यासोबत इतर १३ आमदारांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. जी. परमेश्वर यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इतर नावांमध्ये यतींद्र सिद्धरामय्या, यू. टी. खादर, एम. बी. पाटील, के. जे. जॉर्ज, के. एच. मुनियप्पा, सतीश जारकीहोळी, रामलिंगा रेड्डी, कृष्णा बायरेगौडा, प्रियांका खर्गे, ईश्वर खंड्रे, बायराथी सुरेश आणि शरण प्रकाश पाटील यांचा समावेश आहे.
दरम्यान, कर्नाटकच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून मुख्यमंत्रीपद आणि नेतृत्वावरून सुरू असलेल्या संघर्षाचा अखेर शेवट झाला आहे. काँग्रेस हायकमांडच्या निर्देशानुसार माजी मुख्यमंत्री डी. के. सिद्धरामय्या यांनी २८ मे रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर नेतृत्वबदलाचा मार्ग मोकळा झाला.
सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे डी. के. शिवकुमार यांच्याकडे राज्याची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कर्नाटकात नव्या राजकीय पर्वाची सुरुवात करत असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, नेतृत्वबदलानंतर पक्षांतर्गत संतुलन राखण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांची काँग्रेस कार्यकारिणी समिती (CWC) सदस्यपदी नियुक्ती केली आहे. या निर्णयातून पक्षाने सिद्धरामय्या यांना सन्मानजनक भूमिका देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, हा निर्णय केवळ नियुक्ती नसून पक्षांतर्गत समतोल राखण्याचा प्रयत्न आहे. एका बाजूला सिद्धरामय्या समर्थकांना महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनाही पक्ष नेतृत्व दोन्ही गटांमध्ये संतुलन राखण्यास कटिबद्ध असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
कर्नाटकातील या नेतृत्वबदलाकडे देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार आगामी काळात कोणत्या धोरणांवर भर देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.






