अहमदाबाद विमान अपघातातील मृत व्यक्तीची नातेवाईकांसह डीएनए चाचणी केली जात आहे (फोटो - सोशल मीडिया)
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघात ही मोठी दुर्दैवी घटना घडली. विमानातील प्रवासी, क्रू मेंबर्स आणि वसतिगृहातील डॉक्टर अशा सर्वांनी जीव गमावले. या विमान अपघातामधील आता मृतांची संख्या २७५ वर पोहोचली आहे. दरम्यान, रविवारी डीएनए सॅम्पलिंगद्वारे 31 मृतदेहांची ओळख पटवण्यात आली. तर २० मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत. मृतांच्या कुटुंबियांशी डीएनए जुळवून ओळख पटवण्यात आली आहे. यावेळी नातेवाईकांनी टाहो फोडला.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या डीएनए मॅचिंगची प्रक्रिया सुरू असल्याचे अतिरिक्त सिव्हिल अधीक्षक डॉ. रजनीश पटेल यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की आतापर्यंत ओळख पटलेले सर्व मृतदेह गुजरात आणि राजस्थानमधील वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. बहुतेक मृतदेह ओळखण्यापलीकडे जळाले होते, त्यामुळे या भयानक दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटविण्यासाठी अधिकारी डीएनए चाचण्या घेत आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
31 DNA नमुने जुळले
आतापर्यंत ३१ डीएनए नमुने जुळले आहेत आणि २० मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत, सरकारी बी जे मेडिकल कॉलेजमधील शस्त्रक्रिया विभागाचे प्राध्यापक पटेल यांनी अशी माहिती दिली आहे. तसेच, कुटुंबियांना मृत्यू प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे लोक उदयपूर, वडोदरा, खेडा, मेहसाणा, अहमदाबाद आणि बोटाड जिल्ह्यातील होते.
पीडित कुटुंबांशी समन्वय साधण्यासाठी २३० पथके तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले होते. लंडनला जाणाऱ्या विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह २४२ लोक होते, त्यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री रुपाणी यांचाही समावेश आहे. त्याच वेळी, एक प्रवासी चमत्कारिकरित्या वाचला.
192 रुग्णवाहिका सज्ज
गुजरात सरकारने सर्व मृतदेह त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी २३० पथके तयार केली आहेत. याशिवाय, १९२ रुग्णवाहिका आणि वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच, मृतदेह ठेवण्यासाठी १७० शवपेट्या बनवण्याचा आदेश देण्यात आला आहे. यापैकी सुमारे १०० शवपेट्या वडोदराहून अहमदाबादला आणण्यात आल्या आहेत.
केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
मृतदेहांचे डीएनए प्रोफाइलिंग पूर्ण
अनेक मृतदेहांचे डीएनए प्रोफाइलिंग पूर्ण झाले आहे. विमानाच्या मागील भागातून एक मृतदेह सापडला आहे. दोन जखमींवर अजूनही आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, फॉरेन्सिक तज्ञ आणि विमान वाहतूक पथके ढिगाऱ्याची तपासणी करण्यात व्यस्त आहेत. या अपघाताची सविस्तर चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बहु-विद्याशाखीय समिती स्थापन केली आहे.