'राम मंदिरातून 20 हजार कोटींची दान चोरी, गैरव्यवहारात बड्या नेत्यांचाही समावेश'; समाजवादी पक्षाच्या नेत्याचा दावा
अयोध्या : अयोध्या येथील राम मंदिरातील दान चोरीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांकडून सरकारवर सातत्याने तिखट शब्दांत हल्ले केले जात आहेत. समाजवादी पक्षाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी मोठा आणि खळबळजनक आरोप केला आहे. ते म्हणाले की, ही देणगी चोरी म्हणजे एक अतिशय मोठा घोटाळा असून, हे संपूर्ण प्रकरण सुमारे २० हजार कोटी रुपयांचे आहे. यामध्ये अनेक बड्या लोकांचा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकरणात अनेक बड्या व्यक्ती सामील असल्यामुळेच, तपासाची सुई खऱ्या सूत्रधारांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. सपा नेत्याने दावा केला की, मोठ्या संख्येने भाविकांनी राम मंदिरात सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या हारांसह मोठ्या प्रमाणावर मौल्यवान वस्तू अर्पण केल्या. परंतु त्यांचा संपूर्ण हिशेब अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. उपलब्ध तथ्यांच्या आधारेच हा २० हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे त्यांचे म्हणणे असून, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
एसआयटीला १५ दिवसांची मुदतवाढ
राज्य सरकारने या दान चोरी प्रकरणाचा तपास करणाऱ्या ३ सदस्यीय एसआयटीचा कार्यकाळ आणखी १५ दिवसांसाठी वाढवला आहे. १३ जून रोजी या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती आणि सुरुवातीला त्यांना १५ दिवसांचा वेळ देण्यात आला होता. आता पुन्हा या मुदतीत वाढ करण्यात आली.
एसबीआयसह 6 बँकांना नोटीस
राम मंदिर दान चोरी प्रकरणाचा तपास आता बँकिंग यंत्रणेपर्यंत पोहोचला आहे. पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडियासह ६ बँकांना नोटीस बजावली असून, संबंधित बँक खाती, लॉकर्स आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांची संपूर्ण माहिती मागवली आहे. तपास यंत्रणा आता पैशांच्या हालचालींचा आणि ‘ट्रांजेक्शन ट्रेल’चा कसून शोध घेत आहेत. देणगीच्या रक्कमेची कुठे-कुठे विल्हेवाट लावली गेली आणि कोणत्याही स्तरावर आर्थिक गैरव्यवहार झाला आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न यंत्रणा करत आहेत.
महंत नृत्य गोपाल दास रुग्णालयात
राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास महाराज यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचारासाठी लखनौ येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यातही त्यांची प्रकृती बिघडली होती, तेव्हाही त्यांच्यावर लखनऊच्या मेदांतातच उपचार करण्यात आले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डॉक्टरांशी संपर्क साधून महंतांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.






