नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत 543 ऐवजी 544 लोकसभा मतदारसंघांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
आयोगाने 16 मार्च रोजी सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यामध्ये असं लक्षात आले की, मतदारसंघांची संख्या 543 लोकसभेच्या जागांशी जुळण्याऐवजी 544 वर पोहोचली आहे. मणिपूरमधील एका मतदारसंघामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. कुमार यांनी निवडणुकीचे वेळापत्रक सादर करताना जम्मू-काश्मीरच्या आयपीएससाठी अशीच योजना आधीच उपलब्ध आहे. तीच आता मणिपूरमध्येही उपलब्ध होईल, असे सांगितले.
मणिपुरात दोन टप्प्यांत मतदान
प्रत्येक मतदारसंघाला एकाच दिवशी आपला खासदार निवडता येतो, पण एकट्या मणिपूर मतदारसंघात दोन दिवस निवडणुका होणार आहेत. मणिपूरमध्ये अलिकडेच निर्माण झालेल्या हिंसाचाराच्या परिस्थितीमुळे इथे दोनदा मतदान होणार आहे.
मणिपूरमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये एक अंतर्गत लोकसभा मतदारसंघ तर एक बाह्य मतदारसंघ आहे. यांपैकी अंतर्गत मणिपूरमध्ये 19 एप्रिलला मतदान होईल, तर बाहेरील मणिपूरमध्ये 19 एप्रिल आणि 26 एप्रिल या दोन तारखांना मतदान होईल.