अखेर भारतात सॅटेलाइट इंटरनेटचा मार्ग मोकळा; एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला मिळाला परवाना
भारतात इंटरनेट सेवा देण्याची एलॉन मस्क यांची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. मात्र दूरसंचार क्षेत्रात त्यांना प्रवेश करता आला नव्हता, मात्र आता ही प्रतिक्षा संपली असून मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीला सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्याचा परवाना मिळाला आहे. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
स्टारलिंकबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले होते की, ‘स्टारलिंकची उपग्रह सेवा दूरसंचार क्षेत्रात नवीन फुलासारखी आहे. पूर्वी फक्त स्थिर रेषा होत्या आणि त्या मॅन्युअली फिरवायच्या होत्या. आज आपल्याकडे ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीसह मोबाइल कनेक्टिव्हिटी आहे. ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी देखील स्थापित झाली आहे. उपग्रह कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. कारण दुर्गम भागात आपण तारा टाकू शकत नाही किंवा टॉवर बसवू शकत नाही. त्यामुळे अशा भागात उपग्रहाद्वारे कनेक्टिव्हिटी सुधारता येते.’
स्टारलिंक ही एलोन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सची उपग्रह इंटरनेट सेवा आहे. ही लो अर्थ ऑर्बिट (LEO) उपग्रह आधारित इंटरनेट सेवा आहे. तिच्या मदतीने जगातील दुर्गम भागात हाय स्पीड इंटरनेट पोहोचवता येते. भारतात स्टारलिंक सेवा सुरू केली जाईल अशी चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे.
स्टारलिंक ५०० ते ५५० किलोमीटर उंचीवरून अनेक लहान उपग्रहांद्वारे काम करते. भारतात स्टारलिंकची चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. कंपनीने २०२१ मध्ये भारतात प्री-बुकिंग सुरू केली होती. मात्र, भारत सरकारकडून आवश्यक परवाना न मिळाल्यामुळे, त्यावेळी कंपनीला प्री-बुकिंग थांबवावं लागलं.
भारतात या कंपनीला रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलच्या वनवेबशी थेट स्पर्धा करावी लागेल. अलीकडेच स्टारलिंकने या दोन्ही कंपन्यांसोबत भागीदारीची घोषणा केली होती. ही घोषणा स्टारलिंकच्या किट आणि हार्डवेअर वितरणाबाबत आहे. स्टारलिंक अनेक देशांमध्ये उपलब्ध आहे आणि भारतात त्याची सेवा सुरू होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे.
आवश्यक परवाना मिळाल्यानंतरही, सॅटेलाइट स्पेक्ट्रमचे चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सॅटेलाईट स्पेक्ट्रम वितरित झाल्यानंतरच, कंपनी भारतात आपली सेवा सुरू करू शकेल. येथे एक आव्हान म्हणजे स्पेक्ट्रम वाटपाची पद्धत. जिओ आणि एअरटेल पारंपरिक पद्धतीने स्पेक्ट्रम लिलाव करू इच्छितात तर स्टारलिंकला प्रशासकीय वितरण हवे आहे.
स्टारलिंक किंवा सॅटलाईट इंटरनेटच्या लोकांना काय फायदा होईल. यामुळे दुर्गम भागात कनेक्टिव्हिटी सोपी होईल. विशेषतः जिथे टॉवर बसवणे किंवा ब्रॉडबँड सेवा प्रदान करणे कठीण आहे. अशा ठिकाणी. सॅटलाईट इंटरनेटमुळे, अशा भागातही चांगली कनेक्टिवीटी उपलब्ध होईल. ही सेवा कोणत्या किमतीत सुरू केली जाते हा देखील एक मोठा प्रश्न आहे. आतापर्यंतच्या अंदाजानुसार, कंपनीची सेवा महाग असेल. स्टारलिंक किटसाठी तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागू शकते. तसंच मासिक किंवा वार्षिक योजना देखील नियमित ब्रॉडबँड योजनांपेक्षा खूपच महाग असणार आहेत.