पावसाचं थैमान! एसीपी ऑफिसचं छत कोसळून सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
शनिवारी रात्री उशिरा दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. आयएमडीने दिल्ली आणि लगतच्या भागात पश्चिम आणि वायव्येकडून वादळ येण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर काही तासांतच दिल्लीत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. वाऱ्याचा वेग ताशी ७० किमी होता तर काही ठिकाणी त्याहून अधिक होता. राष्ट्रीय राजधानी नोएडा, गुरुग्राम, फरीदाबाद, गाझियाबाद आणि ग्रेटर नोएडासह अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतला पावसाळापूर्व कामांचा आढावा; अधिकाऱ्यांना दिले महत्वाचे निर्देश
दरम्यान गाझियाबादमध्ये एक दु:खद घटना घडली. अंकुर विहार एसीपी कार्यालयाचं छत कोसळून उपनिरीक्षक वीरेंद्र कुमार मिश्रा (५८) यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. खोलीचा दरवाजा उघडा आढळल्याने संशय आला तेव्हा शोध सुरू करण्यात आला. वीरेंद्र कुमार मिश्रा हे ढिगाऱ्याखाली गडकले होते. पोलिसांनी मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
दिल्लीत शनिवारी पाऊस येण्यापूर्वी धुळीचं वादळ आलं. जोरदार वाऱ्यामुळे कोरड्या फांद्या तुटून पडल्या. संपूर्ण प्रदेशात हवामान अस्थिर असल्याने अधिकाऱ्यांनी रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. रविवारी सकाळी मुसळधार पाऊस आणि वादळानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील अनेक भागात पाणी साचले होते. बाधित भागात मोती बाग, मिंटो रोड आणि दिल्ली विमानतळ टर्मिनल १ जवळील भागांचाही समावेश आहे. दिल्लीच्या मिंटो रोडवर मुसळधार पावसामुळे झालेल्या पाण्यात एक कार बुडाली आहे.
एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत हे दुसरं मोठं वादळ होतं. यापूर्वी २१ मे रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार धुळीचं वादळ आलं होतं. वाऱ्याचा वेग ५०-६० किमी/ताशी सुरू होऊन तो ७० किमी/ताशीपर्यंत पोहोचला. पश्चिमी विक्षोभ आणि काळी बैसाखी ही यामागील कारणे मानली जातात. नॉर’वेस्टरला भारतात काल बैसाखी म्हणूनही ओळखलं जातं. हे एक तीव्र वादळ आहे जे प्रामुख्याने पूर्व भारतात, सहसा पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, झारखंड आणि बिहार आणि बांगलादेशमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात मान्सूनपूर्व हंगामात येतं.
नॉर’वेस्टर हा शब्द वादळाच्या वायव्येकडून पूर्वेकडे होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण हालचालीला सूचित करतो. काल बैसाखी हे स्थानिक नाव आहे ज्याचा अर्थ ‘बैशाख महिन्यातील आपत्ती’ (एप्रिल-मे) आहे. त्याच्या विनाशकारी स्वरूपाचे संकेत देते. काल बैसाखी किंवा नॉर’वेस्टर वादळे आपल्यासोबत मुसळधार पाऊस घेऊन येतात. काल रात्री उशिरा २ च्या सुमारास दिल्ली एनसीआरमध्येही असाच पाऊस पडला.