मुंबई : गुजरात आणि हिमाचल प्रदेश (Gujarat-Himachal Pradesh Election) या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी (Assembly Election Results) आज जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला (Vote Counting) सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांत पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यात सध्या भाजपचे (BJP) सरकार आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यात भाजप सत्ता राखणार की विरोधक सत्ता खेचून नेणार हे आज स्पष्ट होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबरला मतदान झाले होते. तर, गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान झाले होते. गुजरातमधील ३७ केंद्रांवर आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली, असे मुख्य निवडणूक अधिकारी पी. भारती यांनी सांगितले आहे.
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील मतमोजणी केंद्रांभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. १८२ सदस्य असणाऱ्या राज्य गुजरात विधानसभेसाठी बहुमताचा आकडा ९२ आहे. गुजरातमध्ये एकूण ६४.३३ टक्के मतदान झाले आहे. हिमाचल प्रदेशात १२ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात ६८ जागांसाठी मतदान झाले होते. हिमाचल प्रदेशमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते.