देशभरात पावसाचा कहर सुरूच; पंजाबमध्ये पूर, उत्तराखंड-जम्मूमध्ये भूस्खलन, रस्ते वाहतूक ठप्प
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागांत मुसळधार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होताना दिसत आहे. असे असताना या मुसळधार पावसामुळे पंजाबमध्ये पूर आला असून, उत्तराखंड-जम्मूमध्ये भूस्खलन झाले. याचा रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
हिमाचल प्रदेशात सोमवारी रात्री उशिरा दरड कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. कुल्लू, सुंदरनगर, चिदगाव येथे भूस्खलनामुळे चार जणांचा मृत्यू झाला. शिमला-कालका रेड सेक्शनवर भूस्खलन झाल्याने ५ सप्टेंबरपर्यंत रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. खराब हवामानामुळे अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत आणि कार्यालयांमध्येही घरून काम करणे पसंत केले जात आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या रेड अलर्ट दरम्यान मंगळवारी जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस पडला. उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, त्याच्या प्रभावामुळे पुढील पाच दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे पूर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
पूरग्रस्त भागात सैन्य तैनात
मुसळधार पावसामुळे पंजाब आणि हरियाणामध्ये पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. सतलज, बियास आणि रावी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ आणि हंगामी नाल्यांमध्ये वाढ झाल्यामुळे पंजाब गंभीर पुराच्या विळख्यात सापडला आहे. पठाणकोट, गुरुदासपूर, फाजिल्का, कपूरथला, तरणतारन, फिरोजपूर, होशियारपूर आणि अमृतसर जिल्ह्यातील गावे सर्वाधिक बाधित झाली आहेत. एनडीआरएफ, लष्कर, बीएसएफ, पंजाब पोलिस आणि जिल्हा अधिकाऱ्यांकडून बाधित भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
दौसामध्ये पूरस्थिती, पाणी घरात
राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक कालवे ओसंडून वाहत आहेत. सखल वस्त्या आणि रस्त्यांवर पाणी पसरले आहे. येथे १७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे राज्यातील ज्या भागात लोक आधीच पाणी साचण्याच्या समस्येचा सामना करत आहेत त्या भागात पूर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.