दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले...
नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. नैऋत्य मोसमी पावसाने पश्चिम हिमालयीन प्रदेशात हाहा:कार उडाला आहे. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या बहुतांश भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसात जम्मू आणि काश्मीरमधील गांदरबल येथे ढगफुटी झाली. मुसळधार पावसामुळे डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलन झाले, ज्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली.
उत्तराखंडमधील पिथोरगड येथे बेली ब्रिज कोसळल्याने सीमावर्ती भागांशी संपर्क तुटला. पंजाब, हरियाणा आणि चंदीगडसह उत्तर भारतातील मैदानी प्रदेशातही चांगला पाऊस झाला. हवामान विभागाने अनेक भागांमध्ये सोसाट्याचा वारा, मेघगर्जना आणि विजांचा इशारा देत लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वायव्य भारतात किमान पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान वायव्य, मध्य, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भारतातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.
अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
वायव्य भारतात, उत्तराखंडमध्ये 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि आसपासच्या परिसरात 20-21 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो. पूर्व उत्तर प्रदेशात 20-22 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात 21 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
पश्चिम मध्य प्रदेशात २०-२३ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस पडू शकतो आणि २०-२१ व २३-२४ ऑगस्ट रोजीही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य प्रदेशात २० ते २५ ऑगस्ट दरम्यान पावसाचा अंदाज असून, २० ते २२ ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात २० ते २२ ऑगस्ट आणि २४ ते २५ ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये २१ ते २२ ऑगस्ट रोजी पावसाचा अंदाज असून, २१ ऑगस्टपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.






