नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एका कार्यक्रमात हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांच्यावर चांगलेच संतापले. शहांनी विज यांना लांबलेले भाषण संपवण्याची सूचना केली. पण त्यानंतरही ते बोलतच राहिले. अखेर त्यांनी त्यांना ‘भाषण संपवा, असे चालणार नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत सुनावत माईक आपल्या हाती घेतला.
त्याचे झाले असे की, हरियाणाच्या सूरजकुंड येथे केंद्रीय गृह मंत्रालयाने एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी अनिल विज यांनी स्वागतपर भाषण केले. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर मुख्य भाषण करणार होते. त्यानंतर अमित शहांचे समारोपाचे भाषण होणार होते.
अनिल विज यांनी यांनी केवळ शहांचे स्वागत करणे अपेक्षित होते. पण त्यांनी अचानक हरियाणाचा इतिहास, हरित क्रांतीतील योगदान, ऑलिम्पिकमधील कामगिरी आदींना हात घातला. शहा त्यांच्यापासून हाताच्या अंतरावर बसले होते. त्यांनी विज यांना लांबलेले भाषण आटोपचे घेण्याची सूचना केली. तशी चिठ्ठी त्यांनी पाठवली. पण विज यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर शहांनी माईक हातात घेत त्यांना थांबण्याची सूचना केली.
त्यानंतरही विज थांबले नाही. त्यानंतर पुन्हा शहांनी त्यांना भाषण थांबवण्याचे सांगितले. ते म्हणाले – तुम्हाला ५ मिनिटे दिली होती. त्यानंतरही तुम्ही साडे ८ मिनिटे भाषण केले. आता तुमचा भाषण थांबवा. ही मोठी भाषणं करण्याची जागा नाही. थोडक्यात संपवा.