महावीर जयंतीनिमित्त 2550 व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे उद्घाटन; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महावीर जयंतीनिमित्त राष्ट्रीय राजधानीतील भारत मंडपम येथे 2550 व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे उद्घाटन केले.

    नवी दिल्ली – आज देशभरामध्ये महावीर जयंती उत्साहात साजरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महावीर जयंतीनिमित्त राष्ट्रीय राजधानीतील भारत मंडपम येथे 2550 व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात त्यांनी भगवान महावीर यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट आणि नाण्यांचे प्रकाशनही केले. महोत्सवामध्ये नरेंद्र मोदी यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी “भारत मंडपम आज भगवान महावीरांच्या 2550 व्या निर्वाण महोत्सवाचा साक्षीदार आहे.  महावीर जयंतीनिमित्त मी देशवासीयांना माझ्या शुभेच्छा देतो. निवडणुकीच्या गदारोळात अशा कार्यक्रमात सहभागी होणे हे आवश्यक आहे अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या.

    पुढे नरेंद्र मोदी यांनी जगभरामध्ये असलेल्या युद्धसदृश्य परिस्थितीचा दाखला देत भगवान महावीर यांच्या विचारांचे महत्त्व सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज संघर्षात सापडलेले जग भारताकडून शांततेची अपेक्षा करत आहे. न्यू इंडियाच्या या नव्या भूमिकेचे श्रेय आमच्या वाढत्या क्षमतेला आणि परराष्ट्र धोरणाला दिले जात आहे, पण मला सांगायचे आहे की, त्यात आमच्या सांस्कृतिक प्रतिमेचा मोठा वाटा आहे. आज भारत या भूमिकेत आला आहे कारण आपण सत्य आणि अहिंसेला आपण पूर्ण आत्मविश्वासाने जागतिक व्यासपीठावर ठेवत आहोत.”

    काल देखील पीएम मोदींनी सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि म्हणाले की भगवान महावीर यांचा शांतता आणि सद्भावनेचा संदेश ‘विकसित भारत’ निर्माण करण्यासाठी देशासाठी प्रेरणा आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर लिहिले, “महावीर जयंतीच्या शुभमुहूर्तावर देशातील सर्व कुटुंबांना माझ्या शुभेच्छा… भगवान महावीर यांचा शांतता, संयम आणि सौहार्दाचा संदेश देशाला ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी प्रेरणा आहे.”