उपराष्ट्रपती पदासाठी आज करणार अर्ज दाखल (फोटो सौजन्य - X.com)
विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी आज म्हणजेच गुरुवारी सकाळी ११:३० वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि रामगोपाल यादव यांच्यासह इंडिया ब्लॉकचे अनेक नेते उपस्थित राहतील असे सांगण्यात येत आहे. ८० विरोधी खासदारांनी प्रस्तावक आणि समर्थक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सोनिया गांधी यांचेही नाव यात समाविष्ट आहे (फोटो सौजन्य – X@INCINDIA)
नामांकनापूर्वी बी सुदर्शन यांनी विरोधी आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली. इंडिया अलायन्सने संविधान सदनच्या सेंट्रल हॉलमध्ये बी. सुदर्शन रेड्डी यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता जिथे मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत यांसारखे सर्व मोठे नेते आणि विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांसारख्या अनेक नेत्यांनी प्रथम सुदर्शन रेड्डी यांचा सन्मान केला.
सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक
यापूर्वी, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नामांकन प्रक्रियेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. सीपी राधाकृष्णन यांनी चार संचांमध्ये नामांकन दाखल केले आहे, ज्याच्या प्रत्येक संचावर २० प्रस्तावक आणि २० समर्थकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पंतप्रधान मोदी मुख्य प्रस्तावक होते. पंतप्रधान मोदींनी पहिल्या संचावर मुख्य प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी केली आहे.
आता तुम्ही उपराष्ट्रपती निवडणुकीचा नंबर गेम कसा आहे याबाबत खरं तर जाणून घेण्याची गरज आहे. यावेळी इलेक्टोरल कॉलेजमध्ये एकूण ७८२ खासदार आहेत. यापैकी ५४२ लोकसभा खासदार आहेत तर राज्यसभेच्या खासदारांची संख्या २४० आहे. पाठिंब्याबद्दल बोलायचे झाले तर, एनडीएला ४२२ खासदारांचा पाठिंबा आहे तर विरोधी पक्षाला एकूण ३१२ खासदारांचा पाठिंबा आहे… तर विजयासाठी ३९१ खासदारांची आवश्यकता आहे. यानुसार, एनडीए उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. आता सर्व लक्ष विजयाचे अंतर किती आहे यावर आहे. त्यामुळे बी सुदर्शन रेड्डी काय कमाल करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.