फोटो सौजन्य - Social Media
बाळाच्या वाढीतील दात येण्याचा टप्पा हा प्रत्येक पालकासाठी थोडासा कठीण असतो. साधारण सहा महिन्यांनंतर बाळाचे पहिले दात यायला सुरुवात होते. या काळात बाळाच्या हिरड्यांमध्ये खाज, सूज आणि वेदना जाणवतात. त्यामुळे बाळ चिडचिडं होतं, सतत रडतं, नीट झोप घेत नाही आणि दूध किंवा अन्न घेण्यासही नकार देऊ शकतं. याचा परिणाम पालकांच्या झोपेवर आणि मानसिक शांततेवरही होतो. अनेक वेळा पालक गोंधळून जातात की बाळाला नेमकं कसं आराम देता येईल. अशा वेळी काही सोपे, सुरक्षित आणि घरच्या घरी करता येणारे उपाय खूप उपयोगी ठरू शकतात. प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. रवि मलिक यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार, खालील चार उपाय केल्यास बाळाच्या दात येण्याच्या त्रासात नक्कीच आराम मिळू शकतो.
बाळाला जास्त त्रास होत असेल तर पालकांनी आपली बोटं नीट स्वच्छ करून हिरड्यांवर हलक्या हाताने मसाज करावा. या मसाजमुळे हिरड्यांवरील ताण कमी होतो आणि बाळाला शांत, सुखद अनुभूती मिळते. अनेकदा मसाज केल्यानंतर बाळाचं रडणं कमी होतं आणि ते रिलॅक्स होतं. जर थेट बोटांनी मसाज करणं कठीण वाटत असेल, तर मलमलचं स्वच्छ कापड वापरता येतं. हे कापड थंड पाण्यात भिजवून हलकं पिळून घ्या आणि बाळाच्या हिरड्यांवर सौम्य मसाज करा. कापडाचा थंडपणा सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतो.
आजकाल बाजारात विविध प्रकारचे सुरक्षित टीथर्स उपलब्ध आहेत. दात येताना बाळाला काहीतरी चावण्याची गरज वाटते. टीथर चावल्याने हिरड्यांवर दाब पडतो, ज्यामुळे वेदना कमी होतात आणि बाळाला आराम मिळतो. मात्र टीथर स्वच्छ आणि बाळाच्या वयानुसार योग्य असावा, याची काळजी घ्यावी. दात येताना बाळाला खाण्यातही अडचण येते. अशा वेळी पालकांनी बाळाला थोडी थंड फ्रूट प्युरी द्यावी. प्युरी सहज गिळता येते आणि तिचा थंडपणा हिरड्यांना आराम देतो. यासोबतच फळांमधील पोषक घटक बाळाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात.
दात येण्याचा हा टप्पा तात्पुरता असतो, पण योग्य काळजी घेतल्यास बाळ आणि पालक दोघांसाठीही तो सहज पार करता येतो. थोडा संयम, प्रेम आणि हे सोपे उपाय केल्यास तुमचं बाळ या त्रासातून लवकर सावरू शकतं.






