उदयपूर: स्पर्धा परीक्षा (Competitive Examination) देऊन अधिकारी होण्याची स्वप्ने आज लाखो तरुण तरुणी पाहत असतात. यासाठी अत्यंत जिद्दी व चिकाटीने रात्रं दिवस अभ्यास देखील करत असतात. मात्र काही लोक या स्वप्नांसाठी चूकीचा मार्ग (fruad case)निवडतात. अशी एक घटना समोर आली आहे. समाजात प्रतिष्ठा वाढवण्यासाठी एका 24 वर्षीय तरुणाने आयपीएस अधिकारी (IPS officer) असल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
राजस्थान येथील बानसूर येथील तरुणाने समाजातील प्रतिष्ठा वाढावी यासाठी गेले दीड वर्षे आयपीएक अधिकारी असल्याचा बनाव रचला होता. आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितल्यामुळे गावामध्ये त्याला खूप मान सन्मान मिळू लागला. त्याचबरोबर त्याने साखरपुडा देखील केला होता. मात्र त्याच्या एका छोट्या चुकीमुळे तो पकडला गेला आणि उदयपूर पोलिसांनी या बनावट आयपीएसला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
मीडिया रिपोर्टनुसार, सुनील सांखला असे त्या आयपीएस अधिकारी असल्याचे नाटक करणार्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यासोबत असणार्या इंद्राज सैनी, अमित चौहान आणि सत्यनारायण कनोलिया यांना देखील ताब्यात घेतले. यावेळी तपासादरम्यान, सुनीलने आपण सीबीआय अधिकारी झाल्याचे गावकऱ्यांना सांगितले होते. तो स्वत:ला महाराष्ट्र कॅडरचा आयपीएस अधिकारी म्हणवून घेऊन मुंबईत पोस्टिंग असल्याचे लोकांना सांगत आहे. अधिक चौकशीत सुनीलने 2020 च्या भरतीत यूपीएससीची तयारी केली होती, पण त्यात त्याची निवड झाली नसल्याचे समोर आले.
असा आला प्रकार समोर
आयपीएस अधिकारी असल्याचे नाटक करणारा सुनील हा भावी मेहुणा आणि इतर काही जणांसोबत उदयपूरला फिरायला आला असता त्याने सर्किट हाऊस मॅनेजरसमोर एक चूक केली. मॅनेजरला त्याच्यावर संशय आला आणि त्याने तात्काळ पोलिसांना फोन केला, त्यावर पोलिसांनी त्याला सॅल्यूट करण्यास सांगितले, तेवढ्यात त्याने विरुद्ध हाताने सॅल्यूट केला आणि तो पकडला गेला. यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि त्याचे फेसबुक पेजही तपासले असता सर्वांनाच मोठा धक्का बसला. या फेक अधिकाऱ्याने सांगितलं की त्याने अनेक युट्यूब चॅनल्सना खोट्या मुलाखतीही दिल्या आहेत.
कुटुंबाची देखील करत होता फसवणूक
गावामध्ये मान मिळवण्यासाठी सुनीलने आयपीएस अधीकारी असल्याचे सांगायला सुरूवात केली. गावात आणि घरी त्याने 263वी रँक मिळवल्याचे खोटे सांगितले. त्याआधी सुनीलने गावात आणि कुटुंबियांना त्याला राजस्थान पोलिस आणि इन्कम टॅक्समध्ये लिपिक म्हणून नोकरी मिळाली असल्याचे सांगितले होते. परंतु तसे काहीही झालेले नाही. गावातील लोक आणि कुटुंबीय विचार करत होते की सरकारी नोकरी सोडून यूपीएससी पास केली आहे.






