
Chikkaballapur Court CCTV Footage, Karnataka Anti Black Magic Act 2017, Woman Arrested
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजुला ही महिला फर्स्ट अॅडिशनल सीनियर सिव्हिल जज आणि जेएमएफसी (JMFC) न्यायालयाच्या परिसरात गेली होती. त्यानंतर तिने न्यायाधीशांच्या दालनात प्रवेश केला. मंजुलाने थेट न्यायाधिशांच्या खुर्चीवर कथितपणे मंत्रोच्चार केलेले पांढऱ्या मोहरीचे दाणे शिंपडले. हा संपूर्ण प्रकार न्यायालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला.
घटनेनंतर दोन दिवसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासले असता महिलेचे हे कृत्य समोर आले. यानंतर न्यायालयाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी नेत्रा यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे संबंधित महिलेचा शोध घेऊन तिला अटक केली.
चौकशीदरम्यान महिलेने आपल्या विरोधात सुरू असलेल्या न्यायालयीन प्रकरणाचा निकाल आपल्या बाजूने लागावा, या हेतूने आपण हे कृत्य केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. न्यायाधीशांच्या दालनात जाऊन टोणा-टोटका केल्याची माहितीही तिने चौकशीत दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी महिलेविरुद्ध ‘कर्नाटक अमानवीय कुप्रथा तसेच काळी जादू प्रतिबंध व निर्मूलन अधिनियम, 2017’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कायदा अंधश्रद्धा, काळी जादू आणि अमानवीय प्रथांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने लागू केला आहे. या कायद्यानुसार अशा कृत्यांवर कारवाईची तरतूद आहे.
अटकेनंतर मंजुला हिला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. दरम्यान, या प्रकरणात महिलेला आणखी कोणाची मदत मिळाली होती का, तसेच या प्रकारामागे इतर कोणी सहभागी होते का, याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे न्यायालयाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, न्यायालयीन परिसरात अशा प्रकारच्या अंधश्रद्धाजन्य कृत्यांना आळा घालण्यासाठी अधिक कडक सुरक्षा उपाययोजनांची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.