File Photo : Sandeep Ghosh
नवी दिल्ली : कोलकाता येथील एका महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आता आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. डॉ. घोष याच्याबाबत त्याच्या शेजाऱ्यांनी धक्कादायक दावा केला आहे.
हेदेखील वाचा : कोलकाता लैंगिक अत्याचार प्रकरणात अपडेट; सीबीआय चौकशीत मोठे खुलासे
सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराची गंभीर दखल घेतली असून, आता आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन आणि प्राचार्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले असतानाच राज्य सरकारकडूनही कारवाई करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोलकाता पोलिसांनी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचा माजी प्राचार्य संदीप घोष आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420, कलम 120B आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली असून, ती आरजी कार मेडिकल कॉलेजमधील गैरप्रकारांची चौकशी करेल.
घोष करायचा पत्नीला मारहाण
डॉ. संदीप घोष हा त्याच्या पत्नीला मारहाण करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतचा दावाच त्याच्या शेजाऱ्यांनी केला आहे. ‘घोष सुमारे दोन वर्षे या घरात राहत होता. जेव्हा त्याच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला तेव्हा त्याने पत्नीला बेदम मारहाण केली होती. यामध्ये तिला रक्तस्त्रावही झाला होता, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली.