देवी म्हणजेच साक्षात आईच. लहान असो मोठा असो, काळा असो की गोरा असो, श्रीमंत असो की गरीब असो आईच आपल्या मुलांवरच प्रेम कधीच कमी होत नाही. आई आपल्या मुलांवर जसं प्रेम करते तेच वात्सल्य देवीचं तिच्या भक्तांसाठी असतं. अशीच एक आख्यायिका आहे ती सप्तश्रृंगी देवीची. तुम्हाला माहितेय का सप्तश्रृंगी मातेची मान वाकडी का आहे ? मराठी फॉरेवर या इन्स्टाग्रामवरुन सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
घडलं असं की, एकदा मार्तंडेय ऋषी देवी सप्तश्रृंगीसमोर दुर्गासप्तर्षीचं पठण करत होते. देवी हे पठण ऐकत होती. ऋषींच्या पठण चालु होतं आणि संपूर्ण वातावरण भक्तीमय होऊन गेलं. मात्र हे सगळं सुरु असताना अचानक एक भक्त संकटात असल्याचं आई सप्तश्रृंगीला जाणवलं. मदतीसाठी त्याने केलेली प्रार्थना देवीपर्यंत पोहोचली. देवी असली तरी शेवटी आईच. तिचं हृदय करुणेने भरुन आलं. आपल्या लेकराला काहीही करुन संकटातून वाचवलं पाहिजे या हेतूने क्षणभराचा विचार न करता आईने पोथीचं श्रवण अर्धवट सोडून ती भक्ताच्या मदतीसाठी धावून गेली.
या भक्ताच्या डोक्यावर हात ठेवत देवीने त्याला आशिर्वाद दिला आणि त्याचं संकट दूर झालं. आई सप्तश्रृंगीने त्य़ा भक्ताचं रक्षण केलं. या सगळ्यात ऋषींनी केलेलं पोथीचं श्रवण देवीने अर्धवटच ऐकलं आणि त्याचचं प्रतीक म्हणून देवी सप्तश्रृंगी मातेची मान वाकडी आहे. याचं कारण असं सांगितलं जातं की देवी आई शास्त्र, परंपरा आणि विधी यांपेक्षाही जास्त भक्तांच्या श्रद्धेला आणि विश्वासाला जास्त महत्व देते. अगदी आई जसं आपल्या मुलांवर माया करते त्य़ांची काळजी घेते तशीच देवीसुद्धा तिच्या भक्तांची काळजी घेते. ती आजही आपल्या भक्तांकडे मान वळवून पाहते आणि म्हणून तिच्या प्रतिमा ही मान वाकडी असलेली दिसते. अशी देवी सप्तश्रृंगीची महती आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






