नांदेड महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात झाली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Nanded Political News : नांदेड : नांदेडमध्ये असलेल्या विविध समस्या, प्रलंबित कामे, मनपाकडून दिल्या जाणाऱ्या व न दिल्या जाणाऱ्या सुविधा याबाबत एकही राजकीय पक्ष बोलायला तयार नाही, सर्वसामान्य मतदारांना काय वाटते, हे विचारण्यासाठी राजकीय पक्षाच्या नेत्यांना फुरसत नाही. ‘केवळ मला पहा फुले वाहा’ असाच एककलमी कार्यक्रम विविध राजकीय पक्षाच्या नेतेमंडळीकडून सध्या राबविला जात असल्याचे दिसून आले.
नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. काँग्रेस वंचित आघाडी, भाजप, (शिवसेना शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशा चौरंगी लढती नांदेड उत्तर भागात बहुतांश ठिकाणी होत असून नांदेड दक्षिण भागात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करून भाजपमुक्त नांदेडचा नारा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे.
माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव बोंढारकर आदींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. नांदेडच्या सर्वांगिण विकासाची हमी घेत ‘आम्ही जिंकणारच’ असा नारा भाजपाने बुलंद केला आहे, तर शिवसेना, राष्ट्रवादी युती, काँग्रेस वंचित आघाडीने मात्र अशोक चव्हाणांची राजकीय कोंडी करण्याचा अजेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे मतदारांचा कल नेमके कोणाच्या बाजूने राहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे देखील वाचा : जिंकण्यासाठी साम,दाम.दंड,भेद…! ठाकरेंच्या उमेदवाराला पोलीस घेऊन एकनाथ शिंदेंच्या घरी, Video आला समोर
विकासकामांचा संकल्पनाम्यात भर
महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असून शेकडो कोटी रूपयांचे कर्ज मनपाच्या डोक्यावर आहे. मनपाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा प्लॅन एकाही राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यातस दिसून आला नाही. विकासकामांपेक्षा वैयक्तिक स्वार्थचि राजकारण करण्यात नेतेमंडळी धन्यता मानत असल्याचे दिसून आले आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे नांदेडमध्ये हजारो कोटी रूपयांचा निधी आला, व त्यातून अनेक विकासकामे झाली, यावर भाजपाच्या संकल्पनाम्यात भर देण्यात आल्याचे दिसून आले आहे.
हे देखील वाचा : भाजपच्या हातून परळी निसटली? पंकजा मुंडेंच्या ‘या’ वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
भाजपाने प्रचाराचे सुक्ष्म नियोजन केले आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा आयोजित केल्या असून अन्य पक्षाच्या तुलनेत भाजपाची यंत्रणा ‘भारी’ ठरल्याचे दिसून आले आहे, काँग्रेस वंचित आघाडीसह भाजपा, शिवसेना शिंदे गटाने विविध प्रभागात प्रचाराचे नारळ फोडले आहेत. उमेदवारांनी सभा बैठका, पदयात्रेच्या माध्यमातून ‘मी च कसा सक्षम आहे’ हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. मनपावर सता मिळविण्यासाठीचा ‘मॅजिक’ आकडा भाजपा गाठेल असे वक्तव्य नुकतेच भाजपाचे महानगराध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर यांनी केले आहे. या ‘मॅजिक’ आकड्यासाठी भाजपाने कोणते ‘लॉजिक’ वापरले हे सांगणे तूर्तास तरी कठीण आहे.
नारेबाजी
भाजपाकडून ‘आम्ही जिंकणारच’ नारा दिला गेला असताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र ‘सत्तेपासून भाजपाला बाजूला सारा’ असा नारा दिला आहे. त्यामुळे मतदार नेमके कोणाकडे सत्ता सोपविणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.






