
मिथुन चक्रवर्तींचा ममता बॅनर्जींवर घणाघात (photo Credit- X)
सभेत उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना मिथुन दा आक्रमक पवित्र्यात दिसले. ते म्हणाले, जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे, तोपर्यंत कोणालाही पश्चिम बंगालची सांस्कृतिक ओळख बदलू देणार नाही. हा बंगाल बंगाली, हिंदू आणि सनातनींचा आहे. आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी एका छताखाली येऊन सध्याच्या भ्रष्ट सरकारला सत्तेवरून खाली खेचावे.”
घुसखोरीच्या मुद्द्यावर बोलताना मिथुन चक्रवर्ती यांनी ममता सरकारवर थेट निशाणा साधला. भारत-बांगलादेश सीमेवर सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर अद्याप कुंपण घालण्यात आलेले नाही. पंतप्रधान मोदींनी वारंवार जमिनीची मागणी करूनही राज्य सरकार सहकार्य करत नाही. जर सीमेवर कुंपण घातले तर बेकायदेशीर घुसखोरी थांबेल. मात्र, घुसखोरांचा वापर करून राज्याची लोकसंख्या बदलणे आणि आपली सत्ता टिकवणे, हेच सध्याच्या सरकारचे उद्दिष्ट आहे, असा आरोप त्यांनी केला. भाजप कोणत्याही भारतीय मुस्लिमाच्या विरोधात नाही, तर जे घुसखोर देशात राहून देशाचे नुकसान करत आहेत, त्यांच्या विरोधात आमचा लढा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या ईडी (ED) च्या छाप्यांचा उल्लेख करत मिथुन चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडले. आय-पीएसी कार्यालयावरील छाप्यादरम्यान मुख्यमंत्री स्वतः तिथे हजर झाल्या होत्या, यावरून त्यांनी प्रश्न उपस्थित केला. फाईलमध्ये काय होते? मुख्यमंत्री ज्या फाईल्स सोबत घेऊन गेल्या, त्यात नक्की काय दडलं होतं? त्या फाईल्समध्ये कोळसा, वाळू किंवा रेशन घोटाळ्याचे हिशोब तर नव्हते ना? असा खोचक सवाल त्यांनी केला. ही फाईल म्हणजे निवडणूक रणनीतीचे दस्तऐवज असल्याचे सांगितले जात असले तरी, त्यातील माहिती उघड होऊ नये म्हणूनच ती घाईघाईने हलवण्यात आली, असा संशय त्यांनी व्यक्त केला.