File Photo : Strike
कोलकाता : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील एका महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणानंतर एकच खळबळ उडाली होती. आता हे प्रकरण चांगलंच तापताना दिसत आहे. याच घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या संघटनेने ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन’ने 12 ऑगस्टपासून संपूर्ण देशात संपाची घोषणा केली आहे.
हेदेखील वाचा : उद्धव ठाकरेंवरील हल्ल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
आरजी कर मेडिकल कॉलेजचे ज्युनियर डॉक्टरही पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. सध्या हे रुग्णालय बंद आहे. पोलिसांनी केवळ एका आरोपीला अटक केली आहे, तर इतर अनेक लोकांचा या घृणास्पद घटनेत सहभाग असू शकतो, अशी देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोपी संजय रॉयच्या अटकेमागे काही मोठी गोष्ट लपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, सर्व सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टर संघटनांना त्यांनी या संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत ओपीडी, ऐच्छिक शस्त्रक्रिया आणि लॅबमधील काम बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आरडीएनेही डॉक्टरांना संपावर जाण्याची नोटीस दिल्याची माहिती आहे.
कॉलेजच्या अधीक्षकांना पदावरून हटवले
आरोग्य विभागाने आरजी कर मेडिकल कॉलेजचे अधीक्षक डॉ. संजय वशिष्ठ यांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या जागी रुग्णालयाचे डीन बुलबुल मुखोपाध्याय यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
आरोपीला 14 दिवसांची पोलिस कोठडी
कोलकाता पोलिसांनी संजय रॉयला न्यायालयात हजर केले असता, त्याला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
हेदेखील वाचा : पंजाबमध्ये मोठी दुर्घटना! इनोव्हा कार नदीत कोसळून 9 ठार, दोनजण बेपत्ता