Vice President Election : चंद्राबाबूंचं अखेर ठरलं ! उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत 'या' उमेदवाराला देणार पाठिंबा
नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यातच आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार असलेले सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला आहे.
तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख असलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या खासदारांसह नवी दिल्लीत महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना सांगितले की, ‘सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतिपदासाठी सर्वात योग्य उमेदवार आहेत. एनडीएने भारताच्या उपराष्ट्रपतिपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांची निवड केली आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे. ते सर्वात योग्य उमेदवार आहेत. त्यांना आमचा पाठिंबा देताना आम्हाला खूप आनंद होत आहे’.
दरम्यान, टीडीपी निवडणुकीपूर्वी एनडीएमध्ये सामील झाली होती. दिल्ली आणि आंध्र प्रदेश दोन्ही ठिकाणी एनडीएचे सरकार आहे. सी. पी. राधाकृष्णन एक आहेत. ते खूप देशभक्त व्यक्ती देखील आहेत. ते आपल्या देशाचा अभिमान वाढवतील, आपण सर्व एकत्र आहोत, अशा शब्दांत त्यांनी पाठिंबा व्यक्त केला.
अमित शहांची रेड्डी यांच्यावर टीका
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर नक्षलवादाला समर्थन दिल्याचा आरोप केला. जर त्यांनी सलवा जुडूमवर निकाल दिला नसता तर २०२० पूर्वी देशातील माओवाद संपला असता, असे ते म्हणाले. काँग्रेसने उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराची निवड केल्याने केरळमध्ये विजयाची शक्यता आणखी कमी झाली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा शरद पवारांना फोन
दिल्लीमध्ये उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक होत आहे. यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना मतदानाबाबत सूचना देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देण्यात आली आहे. यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचे शरद पवार व उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. यावरुन फडणवीसांवर टीका होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधून या सर्व टीकांना उत्तर दिले आहे.