सरसंघचालक मोहन भागवत (फोटो- आरएसएस ट्विटर)
बांग्लादेशमध्ये सत्तापालट झाल्यानंतर देखील काही भागात हिंसाचार सुरूच आहे. आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाने तीव्र स्वरूप धारण केले आणि चक्क त्याकाळातील पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जावे लागले आणि पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर तिथे सुरू झालेल्या हिंसाचारात हिंदू समाजातील लोकांवर देखील हल्ले होऊ लागले आहेत. यावर अनेक दिवसांपासून चिंता व्यक्त केली जात आहे. तिथे होणाऱ्या हिंदूंवरील हल्ल्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे. तेथील हिंदूंना अत्याचाराचा सामना करावा लागू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे ते म्हणाले आहेत.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आज महल येथील संघ कार्यालयात झेंडावंदन पार पडले. यावेळी मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, ”बांग्लादेशात राहणाऱ्या हिंदूंना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही आपली जवाबदारी आहे.”
पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले, ”स्वातंत्र्याच्या ‘स्व’ चे रक्षण करणे हे येणाऱ्या पिढीचे कर्तव्य आहे. जगात अशी अनेक लोक असतात त्यांना इतर देशांवर सत्ता मिळवायची असते. आपण त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे तसेच त्यांच्यापासून स्वतःचे रक्षण केले पाहिजे. परिस्थिती नेहमी सारखी राहत नाही. कधी स्थिती चांगली असते तर कधी चांगली नसते. हे चढ-उतार तर सुरूच राहतात.दुसऱ्यांची मदत करणे ही भारताची परंपंरा आहे. आपण गेले काही वर्षे पाहिले असेल की, भारताने कोणावर आक्रमण केले नाही. तर अडचणीत अडकलेल्यांची मदतच केली आहे.