भारत रशियाला मोठा धक्का देणार? 'या' आवश्यक गोष्टीची खरेदी कमी करण्याची तयारी
नवी दिल्ली / संतोष ठाकूर : भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करतो. यातून मिळणारा पैसा रशिया युक्रेन युद्धात वापरत आहे, असा आरोप करत अमेरिकेने भारतावर टॅरिफ लादला आहे. यानंतर आता भारताने एक मोठा निर्णय घेत येत्या काळात रशियाकडून तेल खरेदी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, याबाबत एक व्यापक योजना आखली जात आहे. रशियाकडून तेल खरेदी कमी केल्यानंतर कोणते पर्याय शिल्लक आहेत ते केंद्र सरकार पाहत आहे. आपण इतर कोणत्या देशांकडून तेल खरेदी करू शकतो. या अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या रशियाकडून तेल खरेदीत कोणतीही कपात केलेली नाही. एका अधिकाऱ्याने सांगितले की, रशियाकडून तेल कमी केल्याने भारतावर कोणताही मोठा आर्थिक परिणाम होणार नाही.
हेदेखील वाचा : Russia Ukraine War : झेलेन्स्कींना झटका! ट्रम्प-पुतिन बैठीदरम्यान रशियन सैन्याचा युक्रेनच्या दोन भागांवर ताबा
याचे कारण असे की, सध्या रशियाकडून खरेदी केले जाणारे तेल जगातील इतर देशांपेक्षा फक्त २-२.५ डॉलर्स स्वस्त आहे. इतकेच नाही तर भारताचा रशियासोबत कोणताही दीर्घकालीन खरेदी करार नाही. ही खरेदी अल्पकालीन किंवा स्पॉट खरेदीवर आधारित आहे.
इतर पर्यायांचा शोध
तज्ज्ञाच्या मते, भारताने अमेरिकेला सांगितले की रशियाकडून तेल खरेदी कमी करायची असेल तर त्याने भारताला पर्याय सांगावा. सध्या भारत अमेरिकेकडून एलएनजी आणि तेल खरेदी करतो. अमेरिका स्वस्त दरात तेल पुरवत असेल तर आपण अमेरिकेकडून तेल खरेदी करू शकतो.
रशिया-युक्रेनमध्ये युद्ध अद्याप सुरू
रशिया-युक्रेनमध्ये युद्ध अद्याप सुरू आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सैन्याने युक्रेनच्या डोनेस्टक भागातील कोलोडियाजी आणि निप्रोपेट्रोव्स्कमधील वोरोन गावावर नियंत्रण मिळवले आहे. याचवेळी युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी, रशियाने युक्रेनवर ८५ ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली असल्याचे म्हटले आहे. हा हल्ला आणि ताबा रशिया युक्रेन युद्धबंदीच्या शांतता करारासाठी अत्यंत धोकादायक मानला जात आहे.