विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेचे छतच कोसळले; जिल्हा परिषद शाळेतील प्रकार (फोटो - istock)
सोलापूर : ‘आझादी का अमृत महोत्सव’ सुरू असताना देशाचे भवितव्य असुरक्षित असल्याचे देवरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा लोहारा येथे सिद्ध झाले आहे. ‘घर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत लोहारा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा शुक्रवारी (दि. १५) घडली.
लोहारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शुक्रवारी स्वातंत्र्यदिवस साजरा करण्यात येत होता. प्रांगणात विद्यार्थी, शिक्षक तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद टेंभूरकर, माता पालक समिती अध्यक्षा प्रिती टेंभूरकर इतर सर्व व्यवस्थापनेचे सदस्य तसेच मोहनसिंग पवार ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित होते. ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असताना वर्ग खोली इमारतीचे समोरील स्लॅब कोसळले.
यावेळी मुख्याध्यापक के. बी. गभने यांच्या तत्परतेने विद्यार्थ्यांची व उपस्थितांची जीवितहानी आणि मोठा अनर्थ टळला. या शाळेची स्थापना १९४९ मध्ये झाली असून, इमारतीची डागडुजी करून आतापर्यंत या धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत होते. मुख्याध्यापकांनी या शाळेतील ३ धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थी बसवणे बंद केलेले आहे.
केव्हाही कोसळू शकते शाळेची इमारत
पुन्हा उर्वरीत तीन इमारत जीर्ण असून, त्या इमारतीचा तोल केव्हाही जावू शकतो. यामुळे शासनाने या बाबीचा विचार करता १९४९ पासून डागडुजी केलेल्या इमारती पाडून विना विलंब बांधकाम करण्यात यावे, अशी विनंती ग्रामवासी लोहारा यांनी केली आहे.
…अन्यथा मोर्चा काढू
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद टेंभूरकर, माता पालक संघ अध्यक्ष व इतर सदस्यांनी बांधकामांची मागणी केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत डागडूजी करून मुलांच्या जिवाशी खेळण्यात अर्थ नाही तसेच मागणी पूर्ण न झाल्यास सर्व विद्यार्थीसह जिल्हा परिषद गोंदिया कार्यालयात विद्यार्थ्यांचा मोर्चा वळविण्याचा इशारा दिला आहे.
अधिकारी तसेच लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष
या शाळेचे मुख्याध्यापक पदावर रुजू झाल्यापासून एका वर्षात शिक्षणाधिकारी गोंदिया, बांधकाम सभापती गोंदिया, गटशिक्षणाधिकारी देवरी, ग्रामपंचायत कार्यालय लोहारा क्षेत्राचे खासदार, आमगाव देवरी क्षेत्राचे आमदार या क्षेत्राच्या जि.प. सदस्य यांना वेळोवेळी पत्र दिले आहे. परंतु, इमारतीचे स्लॅब कोसळेपर्यंत कोणतीही इमारत बांधकाम झालेले नाही. यावरून स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी शालेय विद्यार्थ्यांसाठी किती सक्रिय आहे, हे दिसून आले आहे.