फोटो सौजन्य - निलेश लंके एक्स (ट्वीटर) अकाऊंट
नवी दिल्ली : लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरु आहे. त्यामध्ये निवडून आलेले खासदार संसदेमध्ये शपथ घेत आहे. अनेक खासदारांनी इंग्रजी, हिंदी, मराठी अगदी संस्कृतमध्ये देखील शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्र अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी घेतलेली शपथ लक्षवेधी ठरली. शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी इंग्रजी भाषेमध्ये शपथ घेतली. त्यांच्या शपथेमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. त्यानंतर निलेश लंके यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणामध्ये निलेश लंके यांना इंग्रजी येत नसल्याच्या कारणावर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखे पाटील यांनी खिल्ली उडवली होती. तसेच माझ्याएवढे इंग्रजी बोलून दाखवावे असे आव्हान देखील दिले होते. यानंतर निलेश लंके यांनी प्रचारावेळी निवडणूक आलो तर लोकसभेत इंग्रजीमध्ये शपथ घेईल असे प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आज निलेश लंके यांनी लोकसभेमध्ये इंग्रजीमध्ये शपथ घेतली. त्यावरुन महाविकास आघाडीकडून खासदार लंके यांचे कौतुक देखील करण्यात येत आहे.
काय म्हणाले निलेश लंके?
एका वाहिनीशी बोलताना निलेश लंके यांनी इंग्रजीतील शपथविधीवर प्रतिक्रिया दिली. खासदार लंके म्हणाले, “निवडणुकीत माझ्यावर काही आरोप केले. संसदेत गेल्यावर इंग्रजीत बोलावं लागतं. तो मुद्दा गाजला. मला ट्रोल केलं गेलं. विजयी झाल्यानंतर मी एका मुलाखतीत सांगितलं की संसदेत जेव्हा जाईन तेव्हा पहिलं जे बोलेन ते इंग्रजीत बोलेन. त्यामुळे आज मी शपथ इंग्रजीत घेतली. असे मत निलेश लंके यांनी व्यक्त केले. पुढे त्यांना इंग्रजीची तयारी कशी केली? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “तयारी करायला एवढं अवघड काय नसतं. कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही. पाण्यात पडल्यावर माणूस पोहोतो. इंग्रजीत शपथ घ्यायची होती, ती घेऊन टाकली. माझंही शिक्षण आहेच ना.” अशी प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी दिली आहे.