NDA की UPA? बिहारमध्ये आता निवडणुका झाल्यास कोणाला सत्ता येणार?
Bihar Assembly Elections 2025: बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरील विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये सध्या काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव मतदार अधिकार यात्रा काढत आहे. बिहारमध्ये सुरू असलेलेल्या विशेष सघन पुर्नपडताळणी आणि सुधारणा या प्रक्रियेत मतदारांची नावे वगळली जात आहे, या प्रक्रियेविरोधात आणि निवडणूक आयोगावर करण्यात आलेल्या मतचोरीच्या आरोपांबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेस आणि आरजेडी ही यात्रा काढत आहे. या वरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात टाईम्स नाऊ-जेव्हीसीने केलेल्या जनमत सर्वेक्षणानुसार, २४३ सदस्यीय विधानसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या स्थितीत आहे. सर्वेक्षणानुसार, एनडीएला १३६ जागा मिळू शकतात, तर राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) नेतृत्वाखालील महागठबंधन ७५ जागांवर मर्यादित राहण्याची शक्यता आहे. बहुमतासाठी आवश्यक आकडा १२२ इतका आहे.
एनडीएमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपच्या जागांमध्ये वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०२० च्या निवडणुकीत ७४ जागा जिंकलेल्या भाजपला यंदा ८१ जागा मिळू शकतात, असे सर्वेक्षण सांगते. याशिवाय, भाजप १७ जागांवर आघाडीवर असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
दुसरीकडे, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडीयू) पक्षाची कामगिरी घसरल्याचे चित्र दिसत आहे. सर्वेक्षणानुसार, जेडीयूला २९ जागांवर विजय मिळवता येईल, तर केवळ २ जागांवर आघाडी असल्यामुळे एकूण जागांची संख्या ३१ वर मर्यादित राहण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये जेडीयूने ४३ जागांवर विजय मिळवला होता. यंदा हा आकडा मोठ्या प्रमाणात घटल्यास नितीश कुमार यांची राजकीय ताकद कमी होऊ शकते, असे निरीक्षण व्यक्त होत आहे.
दुसऱ्या बाजूला, महाआघाडीच्या गोटातून राजदला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. तेजस्वी यादव आणि लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाला (राजद) ५२ जागा मिळू शकतात. सध्या राजद ३७ जागांवर विजयी होऊ शकतो, तर १५ जागांवर आघाडीवर असल्याचे सर्वेक्षण सूचित करते. २०२० च्या निवडणुकीत राजदने ७५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले होते, मात्र यंदा त्यांची कामगिरी घसरणार असल्याचे संकेत आहेत.
काँग्रेस पक्षाच्या बाबतीत, ओपिनियन पोलनुसार त्यांना केवळ १० जागा मिळण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये काँग्रेसने १९ जागा जिंकल्या होत्या. या वेळेस पक्ष ८ जागांवर आघाडीवर असून, केवळ २ जागांवर आघाडी असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय, महाआघाडीत समाविष्ट असलेल्या इतर छोट्या पक्षांना एकत्रितपणे १३ जागा मिळू शकतात. इतर पक्षांबाबत बोलायचे झाल्यास, प्रशांत किशोर यांच्या ‘जन सूरज’ पक्षाला २ जागा, एआयएमआयएमला (AIMIM) ३ जागा, तर बहुजन समाज पक्षाला (BSP) १ जागा मिळण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार, राज्यातील २६ जागांवर तिरंगी आणि चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
सीमांचल प्रदेशातील २४ जागांपैकी एनडीए आणि महाआघाडी यांना प्रत्येकी १०-१० जागा मिळू शकतात, तर AIMIM ला ३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. एका जागेवर चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुस्लिम बहुल असलेल्या या भागात महाआघाडीला अधिक जागा मिळण्याची अपेक्षा होती, मात्र सर्वेक्षणानुसार तितकं यश मिळेल असे दिसत नाही.