जेवर विमानतळाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव! योगी सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत ३९ प्रस्तावांना मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक पदावरील सेवेची २५ वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. योगी आदित्यनाथ यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदी यांनी सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माण यांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण केल्याचेही त्यांनी नमूद केले.
उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण ३९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या निर्णयांची माहिती दिली. या वेळी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक आणि सहयोगी पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्या सार्वजनिक सेवेतील २५ वर्षांच्या प्रवासाबद्दल उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने अभिनंदनाचा प्रस्तावही मंजूर केल्याचे सांगण्यात आले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील विकासकामांचाही आढावा घेतला. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात ४२ नवीन महामार्गांची उभारणी झाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयामुळे उत्तर प्रदेशात पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मार्च २०२६ रोजी जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. हे विमानतळ एकूण चार टप्प्यांमध्ये विकसित करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासी क्षमतेच्या दृष्टीने ते आशियातील प्रमुख विमानतळांपैकी एक ठरू शकते.
जेवर विमानतळाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ३,३०० एकर जमिनीवर टर्मिनल आणि धावपट्टी विकसित करण्यात आली आहे. या टप्प्यात विमानतळाची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता सुमारे १.२ कोटी असल्याचे सांगण्यात येते. या विमानतळामुळे नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील प्रवाशांना हवाई वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच पर्यटन, उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
अभिमानास्पद! इस्राइल व अमेरिकेकडून Captain Smit Machhar यांचा होणार नागरी शौर्य सन्मान






