बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना फटकारल्यानंतर आता बाबा रामदेव यांच्या मालकीच्या पंतजली कंपनीवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. उत्तराखंड सरकारने पंतजलीच्या 14 उत्पादनावर बंदी घातली आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकाशन आणि प्रसारणाबाबत सर्वोच्च न्यायालयात ३० एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. सुनावणीच्या एक दिवस आधी, उत्तराखंड सरकारने पतंजलीच्या दिव्या फार्मसीच्या 14 उत्पादनांवर बंदी घातली.
[read_also content=”मोठी बातमी! AstraZeneca कंपनीनं मान्य केलं की, लोकांमध्ये कोवीशिल्ड लसीचे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात https://www.navarashtra.com/india/astrazeneca-admits-that-covishield-can-cause-rare-side-effect-like-blood-clotting-nrps-528471.html”]
पतंजलीच्या दिव्या फार्मसीच्या 14 उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. पतंजली दृष्टी आय ड्रॉप व्यतिरिक्त, यात श्वासरी गोल्ड, श्वासरी वटी, दिव्या ब्रॉन्कोम, श्वासरी प्रवाही, श्वासरी अवलेह, मुक्ता वती एक्ट्रा पॉवर, लिपिडॉम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्ट्रा पॉवर, लिवामृत ॲडव्हान्स, आयजी गोल्ड यांचा समावेश आहे.
उत्तराखंड सरकारच्या औषध नियंत्रण विभागाने नोटीस जारी केली की, दिव्या फार्मसीचा परवाना त्याच्या उत्पादनांच्या परिणामकारकतेबद्दल दिशाभूल करणाऱ्या जाहिराती वारंवार प्रसारित आणि प्रकाशित केल्यामुळे थांबवण्यात आला आहे. परवाना निलंबित करण्याबरोबरच इतर सर्व तपशील आणि कागदपत्रे तातडीने सादर करण्याच्या सूचनाही विभागाने दिल्या आहेत.
खरे तर सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती सुरूच होत्या. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बंद करण्याच्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल न्यायालयाने सरकारला फटकारले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ३० एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. सुनावणीच्या एक दिवस आधी, उत्तराखंड सरकारने पतंजलीच्या 14 उत्पादनांवर घाईघाईने बंदी घातली. पतंजली आयुर्वेदाचे संस्थापक बाबा रामदेव यांच्या विरोधात अवमानाचा खटला चालवायचा की नाही याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय 30 एप्रिल रोजी होणार आहे.






