कन्याकुमारी : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये सुरु आहे. येत्या 1 जून रोजी मतदानाचा शेवटचा सातवा टप्पा पार पडणार आहे. येत्या 4 जून रोजी देशामध्ये लोकसभेचा निकाल लागणार आहे. यावर्षीची लोकसभा निवडणूक जोरदार रंगली असून एनडीए आघाडी विरुद्ध इंडिया आघाडीने लढत झाली आहे. त्यामुळे कोणाला बहुमत मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचाराचा शेवट ध्यान करुन होणार आहे. येत्या 30 मे रोजी नरेंद्र मोदी हे कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या ‘रॉक मेमोरियल’ या स्मारक स्थळाला भेट देऊन ध्यानधारणा करणार आहे. याबाबत भाजप नेत्यांनी अधिकची माहिती दिली आहे.
एक दिवस ध्यानमग्न अवस्थेत
भाजप नेत्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 30 मे संध्याकाळपासून ते 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत मोदी ध्यानमंडपमध्ये ध्यानमग्न अवस्थेत राहणार आहेत. अशी धारणा आहे की त्या जागी अध्यात्मिक विभूती असणाऱ्या विवेकानंदांना याच ठिकाणी ‘भारतमाता’ संबंधी दिव्यदृष्टी मिळाली होती. विवेकानंदांनी या जागी ध्यानधारणा केली होती. भारतभर भ्रमण करुन या ठिकाणी तीन दिवस ध्यान करत विकसित भारताचे स्वप्न विवेकानंदांनी पाहिले होते. त्या जागी नरेंद्र मोदी देखील ध्यान करणार आहेत. मागच्या लोकसभेच्या निवडणूकीच्या प्रचारानंतर पंतप्रधानांनी केदारनाथ गुहेत अशाच पद्धतीने ध्यान केले होते, असे मत भाजप नेत्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे.
आचारसंहित असताना गुप्त प्रचाराचा प्रयत्न
मात्र विरोधकांकडून नरेंद्र मोदी यांच्या या ध्यानधारणेला विरोध करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. मतदानाच्या दोन दिवस आधी निवडणुकीचा प्रचार संपतो. त्यामुळे देशभरामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता चालू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हा कन्याकुमारी दौरा विरोधकांना मान्य नाही तमिळनाडू प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष के. सेल्वापेरुन्थगाई यांनी प्रचार संपल्यानंतर अशा प्रकारची चाल म्हणजे “गुप्त प्रचार” करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत के. सेल्वापेरुन्थगाई म्हणाले, मतदानाच्या 48 तास आधीपासून (लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी) कोणताही प्रचार न करण्याच्या कालावधीत माननीय मोदींना मीडियाद्वारे अप्रत्यक्ष प्रचार करायचा आहे हे स्पष्ट आहे. यासंदर्भातील पत्र उद्या (बुधवारी) निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. गरज पडल्यास (आम्ही) न्यायालयातही जाऊ.” अशी आक्रमक भूमिका कॉंग्रेस नेत्यांकडून घेण्यात आली आहे.