Bihar Assembly Elections 2025: बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये – राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडी – जागावाटपावरून बैठकांचे सत्र सुरू आहेत. दोन्हीकडील नेते “सर्व काही सुरळीत” असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात दोन्ही बाजूंमध्ये जागावाटपावरून गंभीर मतभेद समोर येऊ लागले आहेत.
महाआघाडीत विविध पक्षांनी केलेल्या जागांच्या दाव्यांमुळे परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. वीआयपी पक्षाचे प्रमुख मुकेश साहनी यांनी ५० जागा आणि उपमुख्यमंत्री पदाची मागणी करून चर्चेला नवा वळण दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आघाडीत तणाव वाढला आहे.
मराठा आरक्षणाचा मार्ग नाही सोपा; नव्या GR विरोधात ओबीसी नेते छगन भुजबळ जाणार कोर्टात
तर काँग्रेसने ६६ जागांचा दावा करताना ५० जागांची यादी राजदकडे सुपूर्द केली आहे. डाव्या पक्षांनी ३०-४० जागांवर दावा केला आहे, तर झारखंड मुक्ति मोर्चा (झामुमो) १२ जागा मागत आहे. दुसरीकडे, पशुपती पारस यांच्या राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीने २० जागांवर दावा केला आहे. आरजेडी स्वतःच किमान १२२ ते १२४ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. मात्र, अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
काँग्रेस ५५
डावे पक्ष ३०
वीआयपी (साहनी) ३० (त्यापैकी १५ जागांवर काँग्रेस/आरजेडीचे उमेदवार)
झामुमो ५ ते ६
पशुपती पारस गट चर्चेत, अट साहनींसारखीच
दरम्यान मागील निवडणुकीत काँग्रेसने ८० जागांवर उमेदवार उभे केले होते आणि १९ जागा जिंकल्या होत्या.
एनडीएमध्ये देखील अंतर्गत संघर्ष वाढताना दिसत आहे. चिराग पासवान (एलजेपी-रामविलास) यांनी ४० ते ५० जागांवर दावा केला आहे, तर एचएएमचे प्रमुख जीतन राम मांझी यांनाही जवळपास तितक्याच जागा हव्या आहेत. जर त्यांना अपेक्षित जागा न मिळाल्या, तर ते स्वबळावर निवडणूक लढवतील. असा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे एनडीएसाठी जागावाटपाचे गणित अधिकच क्लिष्ट बनले आहे.
दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू असली तरी अंतर्गत गटबाजी, पदांच्या अपेक्षा आणि प्रादेशिक पक्षांची वाढती ताकद यामुळे जागा वाटपात तडजोडीचा ताण जाणवतो आहे. पुढील काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे, परंतु अंतिम युतीचे स्वरूप कसे असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जीतन राम मांझी यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत एनडीएच्या घटक पक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सर्व २४३ जागांसाठी तयारी करण्याचे निर्देश दिले. तर दुसरीकडे, चिराग पासवान यांचे मेहुणे अरुण भारती यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून २०२० च्या विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रीया देत आगामी निवडणुकीसाठीही आम्ही सज्ज असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, उपेंद्र कुशवाह यांनी दोन दिवसांपूर्वी पाटण्यातील मिलर स्कूल येथे रॅली काढून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, जेडीयू १०२ जागांवर आणि भाजप १०१ जागांवर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत मांझी आणि चिराग पासवान यांच्या दाव्यांमुळे एनडीएमध्येच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.