काँग्रेस कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक
काँग्रेस नेते राहुल गांधी आज आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अश्यातच, वाराणसीमध्ये युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या अनोख्या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वाराणसीमधील राहून गांधींच्या वाढदिवसाच्या सेलेब्रेशनचा व्हिडियो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यात राहुल गांधींचे एक पोस्टर परशुराम अवतारात दाखवण्यात आले आहे. तसेच हातात संविधानाची प्रत घेतलेल्या त्यांच्या पोस्टरवर कार्यकर्ते दुग्धाभिषेक करत आहेत.
वाराणसीतील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचे भगवान परशुरामाच्या रूपातील पोस्टर तयार केले होते. या पोस्टरमध्ये एका हातात फरसा आणि दुसऱ्या हातात भारतीय संविधानाची प्रत दाखवण्यात आली होती. कार्यकर्त्यांनी या पोस्टरवर दूध आणि गंगाजलाने अभिषेक केला. तसेच लाडूपासून तयार केलेला केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी संदेश देत राहुल गांधी यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
Best wishes to the Leader of the Opposition in the Lok Sabha, Shri Rahul Gandhi Ji on his birthday. Praying for his good health and long life. @RahulGandhi — Narendra Modi (@narendramodi) June 19, 2026
या कार्यक्रमाबाबत बोलताना काँग्रेस प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी सांगितले की, हा कार्यक्रम आयोजित करणारे कार्यकर्ते ब्राह्मण समाजातील असून त्यांनी आपल्या श्रद्धा आणि भावना व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवला. त्यांनी भाजपवर टीका करताना धार्मिक मुद्द्यांवरही अनेक प्रश्न उपस्थित केले आणि काँग्रेसच्या भूमिकेचे समर्थन केले.
#WATCH | Varanasi, Uttar Pradesh: Youth Congress performs ‘dugdhabhishek’ on a poster of Rahul Gandhi. The poster depicts him with an axe of Lord Parshuram on his one hand and Constitution of India in the other. (Video: Youth Congress, Varanasi) pic.twitter.com/uD3Ct1yjcA — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 19, 2026
काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली. “लोक राष्ट्रीय नेत्यांना त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वांशी जोडून पाहतात. काही जण राहुल गांधींकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा बिरसा मुंडा यांच्याप्रमाणे पाहतात. परशुरामांवर कोणाची मक्तेदारी नाही,” असे ते म्हणाले. तसेच हिंदू असणे आणि विशिष्ट राजकीय विचारसरणीशी जोडले जाणे यात फरक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पक्षाने सोशल मीडियावर विशेष संदेश प्रसिद्ध केला. अन्याय, असमानता आणि सत्तेच्या गैरवापराविरोधातील त्यांच्या लढ्याचे कौतुक करत, त्यांनी लाखो लोकांना प्रेरणा दिल्याचे पक्षाने म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त वाराणसीत झालेला हा अनोखा कार्यक्रम आणि त्यानंतरच्या राजकीय प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.






