File Photo : Ram Rahim
नवी दिल्ली : दोन महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळेच न्यायालयाने त्याला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, आता त्याला कोर्टाकडून पॅरोल मंजूर झाला आहे. हा पॅरोल मंजूर झाल्याने गुरमीत राम महीम आता तुरुंगातून बाहेर येणार आहे. दरम्यान, या हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्याला पॅरोल मिळाल्याने काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यात आता गुरमीत राम रहीम मतदानाच्या 3 दिवस आधी पुन्हा एकदा तुरुंगाबाहेर आला आहे. सकाळी 6.30 च्या सुमारास ते रोहतकच्या सुनारिया कारागृहातून उत्तर प्रदेशातील बागपत येथील बर्नवा आश्रमासाठी रवाना झाला. राम रहीमला 20 दिवसांचा सशर्त पॅरोल मिळाला आहे. राम रहीमला कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुनरिया तुरुंगातून बाहेर आणण्यात आले. सकाळी 6 वाजल्यापासून कारागृहाबाहेर गोंधळ वाढला होता. प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कडक केली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या फायद्यासाठी राम रहीमची पॅरोलवर सुटका झाल्याचीही चर्चा आहे. मात्र, त्याचा पॅरोल अटींसह आहे. पॅरोलच्या कालावधीत त्याला हरियाणात राहू नये किंवा सोशल मीडियावर सक्रिय राहू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. या अटींचे उल्लंघन केल्यास त्याचा पॅरोल त्वरित रद्द केला जाईल.
काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
काँग्रेसने या प्रकरणी निवडणूक आयोगाला पत्र लिहून राम रहीमला यावेळी पॅरोल देणे योग्य नाही. त्याचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, असे म्हटले होते. या सगळ्यात रात्री उशिरा हरियाणा सरकारने राम रहीमच्या सुटकेचे आदेश जारी केले.