वधू-वरांना दिली सत्यशोधक शपथ
डॉ. प्रल्हाद इंजे यांनी या विवाहाचे प्रयोजन सांगून उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. यशपाल बनसोडे यांनी वधू-वरांना सत्यशोधक शपथ दिली. या विधी सोहळ्यास चंद्रमणी बनसोडे यांनी सहकार्य केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जोडीदार निवड या उपक्रमातून साकार झालेल्या या विवाहाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
अनुकरणीय सत्यशोधक पद्धतीचा अवलंब केला
नाशिक येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. इंदिरा आठवले-वाघ, औरंगाबाद येथील डॉ. पुष्पा बनसोडे, ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत सांगलीचे प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते, इंजे, येवले कुटुंबीय, नातेवाईक, निढळ गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी आदर्श व अनुकरणीय सत्यशोधक पद्धतीचा विवाह केल्याबद्दल नव दाम्पत्यांचे अभिनंदन केले.
अवांतर खर्चाला फाटा देत सेवाभावी संस्थांना मदत
सोनल-प्रसाद या नवविवाहित दाम्पत्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून विवाह सोहळ्यातील अवांतर खर्चाला फाटा देऊन नवी मुंचईतील कचरा वेचक महिलांच्या परिसर सखी विकास संस्थेला वीस हजार व बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कराड-कार्वे फाटा येथील महाविहार बांधकामासाठी दहा हजार रुपयांची देणगी दिली आहे. या युनिक विवाहाच्या स्वागत समारंभास रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी नवविवाहित सोनल प्रसाद या दांपत्याचे व या आंतरजातीय विवाहास संमती देणाऱ्या इंजे व येवले कुटुंबीयाचे अभिनंदन केले.






