ट्रेनच्या बोगीत लागलेली आग विझवतानाच फायर सिलिंडरचा स्फोट, आरपीएफ कॉन्स्टेबलचा दुर्देवी मृत्यू!

ट्रेनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली आणि ती विझवताना अग्निशमन सिलिंडरचा स्फोट झाल्याने ड्युटीवर असलेल्या आरपीएफ हेड कॉन्स्टेबलचा जीव गेला. वलसाड-मुझफ्फरपूर ट्रेनमध्ये ही घटना घडली.

    कुठे आग लागल्याची घटना घडली असेल तर आपण सगळ्यात आधी अग्निशमन दलाला याची माहिती देतो किंवा जर त्या ठिकाणी  फायर सिलिंडरने (Fire Extinguisher) असेल तर आग विझवण्याचा प्रयत्न करतो. या फायर सिलिंडरचा वापर आग विझवण्यासाठी करणं सोयीचं ठरतं. पण याच फायर सिलिंडरचा स्फोट होऊन एका आरपीएफ कॉन्स्टेबलचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकावर वलसाड एक्स्प्रेसच्या (Valsad Express) बोगीत शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. यावेळी आग विझवताना आरपीएफ कॉन्स्टेबलने फायर सिलिंडरचा वापर केला. मात्र, त्याचाच स्फोट होऊन विनोद कुमार या आरपीएफ कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. रेल्वे अधिकाऱ्यांनी विनोद कुमार यांना रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

    लॅाक उघडताच सिलिंडरचा स्फोट

    मिळालेल्या माहितीनुसार, वलसाड एक्स्प्रेस सोमवारी सकाळी 6.30 वाजता मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकावर  आली. काही वेळानंतर रेल्वेच्या एस-८ बोगीच्या टॉयलेटमधून आगीच्या ज्वाळांच्या ज्वाला निघू लागल्या. आगीची माहिती मिळताच रेल्वे आणि आरपीएफच्या पथकांनी येथे पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. आग आटोक्यात आणण्यासाठी आरपीएफ जवान विनोद कुमारही दाखल झाले. त्यांनी फायर सिलेंडरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. आगीचा एक सिलिंडर संपला पण आग विझली नाही. दरम्यान, त्यांनी दुसऱ्या फायर सिलिंडरने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. सिलिंडरचे कुलूप उघडताच सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये विनोद कुमारचा मृत्यू झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, त्याचा जागीच मृत्यू झाला.

    आरपीएफने मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून तपास सुरू केला. आरपीएफनुसार, कॉन्स्टेबल विनोद कुमार हा आरा नगर भागातील रहिवासी होता. मुझफ्फरपूर आरपीएफ पोस्टमध्ये दोन वर्षे कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती केली होती. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांची अवस्था बिकट असून या घटनेनं त्यांना जबर धक्का बसला आहे.