सौजन्य : iStock
मुंबई : नोटाबंदीनंतर पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करून नव्या पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या. पण नंतर याच दोन हजारांच्या नोटाही चलनातून बाद करण्यात आल्या. या नोटा परतही मागवण्यात आल्या होत्या. मात्र, 7,409 कोटी रुपयांच्या नोटा अद्यापही लोकांकडे असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या एका निवेदनात दिली.
भारतीय रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023 रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. 19 मे 2023 पर्यंत, त्यावेळी चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या बँक नोटांचे एकूण मूल्य 3.56 लाख कोटी रुपये होते. 31 जुलै 2024 रोजी ते 7409 कोटी रुपयांवर घसरले आहे. यानुसार, 19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटांपैकी 97.92 टक्के नोटा परत आल्याची माहितीही आरबीआयने दिली आहे.
अहमदाबाद, बंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुअनंतपुरम येथे 19 आरबीआय कार्यालये बँक नोटांची ठेव/बदली देत आहेत. या ठिकाणांचा एकत्रित डेटा मिळून ही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, नोव्हेंबर 2016 मध्ये 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर 2000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या होत्या. 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत देशातील सर्व बँक शाखांमध्ये 2000 रुपयांच्या बँक नोटा जमा किंवा बदलण्याची सुविधा उपलब्ध होती. 19 मे 2023 पासून रिझर्व्ह बँकेच्या 19 इश्यू ऑफिसमध्ये नोटाबंदीच्या 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची सुविधा उपलब्ध आहे.