भारतातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले तिरुपती मंदिराच्या प्रसादामध्ये फिश ऑईल असल्याचे सिद्ध झाले आहेत. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती मंदिरातील प्रसादामध्ये तूपाऐवजी प्राण्यांचा चरबीचा वापर केला जात असल्याचा आरोप लावला होता. त्यानंतर प्रसादाचा नमुना हा तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आता त्या तपासणीचे रिपोर्ट समोर आले आहेत. त्यामध्ये प्रसादात फिश ऑईल वापरले जात असल्याचे समोर आले आहे. चंद्राबाबू नायडू यांनी आरोप लावला होता की माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपती मंदिराच्या प्रसादामध्ये चर्बी मिळविण्यात आली होती.
चंद्राबाबू नायडू यांनी एका कार्यक्रमात सांगितले की तिरुपतींच्या प्रसादामध्ये तूपाच्या जागी चरबी आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे सामान वापरले जात असे. त्यांचे सरकार आल्यानंतर प्रसादाचा दर्जा सुधारला आहे.
वायएसआरसीपीने नाकारले होते आरोप
वायएसआरसीपीचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी म्हणाले, चंद्राबाबू नायडू यांनी दिव्य तिरुमला मंदिराच्या पावित्र्याला आणि कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला हानी पोहोचवून मोठे पाप केले आहे. चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमला प्रसाद यांच्यावर केलेली टिप्पणी अत्यंत वाईट आहे. मानवजातीत जन्मलेली कोणतीही व्यक्ती असे शब्द बोलत नाही किंवा असे आरोप करत नाही. चंद्राबाबू नायडू राजकारणासाठी काहीही चुकीचे करायला मागेपुढे पाहणार नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
वायवी सुब्बा रेड्डी पुढे म्हणाले की, भक्तांचा विश्वास दृढ करण्यासाठी ते आणि त्यांचे कुटुंब तिरुमला प्रसादच्या बाबतीत शपथ घेण्यास तयार आहेत. चंद्राबाबू नायडू यांनाही त्यांनी तसे आव्हान दिले आहे.
भाविकांचा रोष अनावर
आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील तिरुमला टेकडीवर भगवान व्यंकटेश्वराला समर्पित तिरुपती मंदिर बांधले आहे. हे तिरुपती बालाजी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे चालवले जाते. हे देशातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात दरदिवशी जगभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. तासंतास रांगेत उभे राहिल्यानंतर तिरुपती बालाजीचे दर्शन मिळते. अशा या जगभरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या देवस्थानामधील प्रसादामध्ये फिश ऑईल मिळाल्याने भाविकांचा रोष अनावर झाला आहे. सोशल मीडियावरही याबाबत भाविक आक्रमक झाले आहेत.