सुदर्शन पटनायक यांनी कांदा आणि वाळूपासून बनवला सांताक्लॉज, जगाला दिला अनोखा संदेश!

जगप्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ख्रिसमसच्या निमित्ताने पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर एक सुंदर संदेश दिला आहे. पटनायक यांनी वाळू आणि कांद्यापासून सांताक्लॉज तयार करून जगाला हिरवे ठेवण्याचा संदेश दिला.

    आज जगभरात नाताळ साजरा केला जात आहे. अनेक जण एकमेकांना भेटून नाताळच्या शुभेच्छा देत आहेत तर कुणी सोशल मीडियाच्या माध्यमातुन आपल्या आपेष्टांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. आपल्या खास शैलीसाठी प्रसिद्ध असलेले जगप्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक (Sudarsan Pattnaik) यांनीही जगभरात लोकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  सुदर्शन पटनायक यांनी ख्रिसमसच्या (Chritmus) निमित्ताने कांदा आणि वाळूपासून सांताक्लॉज तयार केला आहे. या कलाकृतीच्या माध्यमातून पटनायक यांनी एक झाड लावा आणि पृथ्वी हिरवीगार ठेवण्याचा संदेश दिला आहे. सुदर्शन पटनायक यांनी सुमारे 2 टन कांदा वापरून सांताक्लॉज बनवला आहे. हे पाहण्यासाठी पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर लोकांची गर्दी होत आहे. आपल्या कलेतून पटनायक यांनी पृथ्वीच्या हिरवाईचा संदेशही दिला आहे.

    दोन टन कांदा वापर करुन बनवला सांताक्लॉज

    जगप्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक म्हणाले की, दरवर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने आपण काहीतरी नवीन आणि सर्जनशील कला निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. पुरीच्या फ्लॅग बीचवरूनही आम्ही जगाला संदेश देतो. यावेळी आम्ही कांद्यापासून सांताक्लॉजची मोठी कलाकृती तयार केली आहे. ही 100 फूट लांब, 40 फूट रुंद आणि 20 फूट उंचीची कलाकृती आहे. यासाठी दोन टन कांदा वापरण्यात आला आहे. पृथ्वीची हिरवळ टिकून राहावी यासाठी आम्ही नाताळच्या निमित्ताने गिफ्ट ए प्लांट, ग्रीन द अर्थ हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. ते तयार करण्यासाठी सुमारे 8 तास लागले.

    झाडे वाचवा आणि झाडे वाढवाचा दिला संदेश

    यावेळी सुदर्शन पटनायक म्हणाले की, आपण अधिकाधिक झाडे लावणे ही या काळाची सर्वात मोठी गरज आहे. यामुळे कलाकृती तयार करण्यासाठी आम्ही कांद्याचा वापर केला आहे. हवामानातील बदल आणि त्यामुळे होणाऱ्या बदलांची आपल्याला जाणीव आहे.  संपूर्ण जग ख्रिसमसचा सण साजरा करत असताना आम्ही भारतात कांद्यापासून ही कला करून झाडे वाचवा आणि झाडे वाढवा असा संदेश जगाला दिला आहे.