नवराष्ट्र टीम
नवी दिल्ली : 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरु झाले आहे. नवीन सरकारमध्ये अनेक नवीन चेहरे समोर आल्याने सर्व देशवासियांचे लक्ष या अधिवेशनाकडे लागले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर दिवंगत मंत्री सुषमा स्वराज यांच्या लेकीची सर्वत्र चर्चा आहे. आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत बांसुरी स्वराज यांनी लोकसभेमध्ये आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. बांसुरी स्वराज यांच्या एका कृतीमुळे सर्वांना सुषमा स्वराज यांची आठवण झाली.
सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांनी पहिल्यांदाच लोकसभेमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या संसद सदस्य म्हणून कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असणार आहे. त्यापूर्वी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बांसुरी स्वराज यांनी शपथ घेतली. मात्र त्यांची ही शपथ इतर सदस्यांहून वेगळी ठरली. त्यांनी आपल्या आईप्रमाणे संस्कृत भाषेमध्ये शपथ घेतली आहे. त्यांच्या संस्कृतमधील शपथेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांना त्यांचा हा अंदाज आवडला असून बांसुरी स्वराज यांनी लोकसभेमध्ये आपली ओळख कायम ठेवली आहे.
नई दिल्ली लोकसभा क्षेत्र के प्रतिनिधि के रूप में आज 18वीं लोकसभा के संसद सदस्य के रूप में शपथ ग्रहण करने का गौरव प्राप्त हुआ। यशस्वी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के प्रतिभाशाली नेतृत्व में हम सब विकसित, समृद्ध और आत्मनिर्भर भारत के संकल्प को पूर्ण करने के लिए प्रतिबद्ध… pic.twitter.com/YiPWWsq9Sn — Bansuri Swaraj (@BansuriSwaraj) June 24, 2024
दिवंगत मंत्री सुषमा स्वराज यांनी देखील लोकसभेमध्ये पहिल्यांदा शपथ घेताना संस्कृतमध्ये घेतली होती. 16 व्या लोकसभेमध्ये त्या संसदच्या सदस्य होत्या. त्यानंतर 18 व्या संसदेमध्ये बांसुरी स्वराज खासदार म्हणून निवडून आल्या असून त्यांनी खासदारकीची शपथ घेतली. आपल्या शपथविधीचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून आज 18व्या लोकसभेचे खासदार म्हणून शपथ घेण्याचा मान मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपण सर्वजण विकसित, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशा भावना बांसुरी स्वराज यांनी व्यक्त केल्या आहेत.






