राहुल गांधी (फोटो ट्विटर)
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात १९ ऑगस्ट म्हणजेच उद्या प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश पुणे कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे राहुल गांधींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांना पुणे कोर्टाने कलम २०४ अंतर्गत हे आदेश दिले आहेत.
लंडनमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याबद्दल एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींवर खटला दाखल करण्यातला कोर्टात धाव घेतली होती. लंडन येथे भारतीय लोकांसमोर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप राहुल गांधींवर आहे. याबाबतचा अहवाल पोलिसांनी पुणे कोर्टात दाखल केला आहे. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे कोर्टात राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले होते.
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, राहुल गांधी हे लंडनमध्ये भारतीय समुदायासमोर भाषण देत होते. यावेळी बोलताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सावरकरांनी एक पुस्तक लिहिले आहे, ज्यात त्यांनी ५ ते ६ मित्रांसह जाऊन एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली असे लिहिले आहे. हे केल्याने मला आनंद झाला असे राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. यावरून सात्यकी सावरकर यांनी या आरोपांचे खंडन केले होते. आता पुणे कोर्टाच्या आदेशानुसार राहुल गांधी कोर्टात हजर राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच हजर राहिल्यास किंवा हजर न राहिल्यास कोर्ट कोणता आदेश देणार हे देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे.