"आधी स्वत:चे घर सांभाळा मग देशाचा विचार करा..",डॉ. श्रीकांत शिंदे यांची राहुल गांधींवर घणाघाती टीका
खासदार डॉ. शिंदे यांनी भाषणाच्या सुरुवातीला एनडीए सरकारच्या विक्रमी अर्थसंकल्पाचे आणि तो नवव्यांदा सादर केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले की १२ वर्षात तीन वेळा भारतीय जनतेने ‘एनडीए’ला आशिर्वाद दिला. तिसऱ्यांदा विजय आणि तीनपट विकास करण्याचे काम एनडीए सरकारने केले. विकसित भारत २०४७ तसेच युवा, महिला, रोजगार या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून सरकारने अर्थसंकल्प सादर केल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. अर्थसंकल्पात भारताला ग्लोबल बायो फार्मा हब बनवण्याचा संकल्प केला असून यासाठी १० हजार कोटींची तरतूद आहे. तसेच मुंबईसाठी अँनिमेशन, व्हिज्युअल्स इफेक्ट्स, गेमिंग आणि काँमिक्स (एव्हीजीसी) या संस्थेची घोषणा करण्यात आली, यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. एमएसएमई ग्रोथ फंडासाठी १० हजार कोटींची तरतूद केली असून यातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना फायदा होईल, असे ते म्हणाले. तसेच औद्योगिक वसाहतींजवळ पाच युनिव्हर्सिटी टाऊनशीप घोषणा करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले की, 2013-24 मध्ये भारताचे बजेट केवळ १६.५० लाख कोटींचे होते मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताचे आजचे बजेट हे ५३.५ लाख कोटींपर्यंत वाढले आहे.
खासदार डॉ. शिंदे यांनी राहुल यांच्या भाषणावर सडकून टीका केली. ते म्हणाले की अमेरिकच्या व्यापारी करारावर बोलण्याआधी त्यांनी इंडि अलायन्समधील घटक पक्षांना एकत्र ठेवण्याकडे लक्ष द्यावे. इंडि अलायन्स पूर्णपणे विस्कटली असून त्यामधील नेत्यांची दहा दिशांना दहा तोंड आहेत. अमेरिकेसोबत डील करण्याचे स्वप्न बघणे विरोधी पक्ष नेत्याच्या तब्ब्येतीसाठी धोकादायक आहे, असे ते म्हणाले.
आर्थिक बाबींवर बोट ठेवताना खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी त्यांच्या आत्मचरित्रात तेव्हाच्या सरकारमधील अर्थखात्याने व्याजदर कमी ठेवण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेबाबत अतिशय सकारात्मक अंदाज वर्तवण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर दबाव टाकला होता. खोट्या तपशीलासह चुकीचा विकासदराचे आकडे सादर केले जायचे, असे ते म्हणाले. १९६२ मध्ये झालेल्या युद्धासंदर्भातील सत्य समोर आणणारा ब्रुक्स अहवाल काँग्रेस सरकारने संसदेपासून दडवून ठेवला. १९६३ साली तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही संसदेत संरक्षण धोरणांबाबत सरकारच्या भूमिकेला विरोध केला असल्याचा दाखला खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिला. ब्रुक्स अहवाल हा काँग्रेस सरकारच्या संरक्षण धोरणांमधील अपयशाचा पुरावा आहे, त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका करण्यापेक्षा आपल्या अंतरंगाकडे बघावे, असा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी लावला. ते पुढे म्हणाले की अक्साई चीनसारखा भूभाग नापीक असल्याने तो घेऊन काय करणार, असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसच्या पंतप्रधानांनी केले होते. तसेच कच्छाथिवू बेट श्रीलंकेला देण्याचे काम काँग्रेसने केले. काँग्रेसने वारंवार भारत मातेचा अपमान करण्याचे काम केले, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली.याउलट जम्मू आणि काश्मिरमधून ३७० कलम हटवून तो भारताचाच भाग असल्याचे एनडीए सरकारने दाखवून दिले.
मागील १२ वर्षात काँग्रेसची देशभरात कोंडी झाली असून यापुढे हे सत्र सुरुच राहील, असे ते म्हणाले. २०१४ पासून भारत विकसनशील अर्थव्यवस्थेच्या दिशेनं वेगाने पुढे जात आहे. काँग्रेस सरकारच्या काळात वस्त्रोद्योग मरणपंथाला लागला होता. मात्र २०१४ नंतर या क्षेत्राला संजीवनी मिळाली असून त्यात आजच्या घडीला एक कोटींहून अधिक रोजगार कार्यरत आहेत.
राष्ट्रीय सुरक्षेला कमकुवत करण्याचे काम पश्चिम बंगालच्या सरकारने केले, असा हल्लाबोल खासदार डॉ. शिंदे यांनी केले. मतांच्या राजकारामुळे बंगाल घुसखोरांचे आश्रयस्थान बनले आहे. वर्ष २०११ ते २०२५ या काळात बंगालमधून ६४०० कंपन्या बाहेर पडल्या. ते म्हणाले की बंगाल हे घुसखोरांची राजधानी बनली असून तेथे उद्योजकांऐवजी घुसखोरांना रेड कार्पेट घातले जाते, अशी खरमरीत टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली.






