Bihar Shocking Incident bagmati River 14 student lost : बिहारमधील मुजफ्फरनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक नाव नदीत उलटली आहे. त्यात १४ विद्यार्थी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या नावेमध्ये एकूण ३० विद्यार्थी होते. ही घटना समोर येताच एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे.
बागमती नदीच्या गायघाटवरील प्रसंग
बिहारमधील बागमती नदीच्या गायघाटवर हा प्रसंग घडला आहे. त्याचे काही व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भटगामाच्या मधुरपट्टीमधील पीपल घाटावरून ही मुले प्रवास करीत होती. त्यावेळी ही घटना घडली.
स्थानिक नागरिकांकडून मुलांचा शोध सुरू
त्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मुलांचा शोध सुरू केला आहे. काहींनी त्या मुलांना नदीतून बाहेर काढले आहे. अनेकजण बेपत्ता आहेत. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. नदीकिनारी नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे. या घटनेनंतर अद्याप प्रशासनाकडून वेगानं हालचाल होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. असं म्हटलं जातंय की, त्या विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी गेलेला एक युवकही बेपत्ता झाला आहे.
पोलीस प्रशासनाचा ढिसाळपणा
घटनेनंतर पोलिस एक तासाने आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित पोलीस ठाण्याला वर्दी दिल्यानंतरही त्यांनी तातडीने पावले उचलणे गरजेचे होते. मात्र, तसे काही झाले नाही. बचाव कार्य करणारी रेस्क्यू टीमही तातडीनं दाखल झाली नाही. त्यामुळे एवढी गंभीर घटना घडल्यानंतरही पोलीस प्रशासनाचा ढिसाळपणा दिसून आला असून ही शरमेची बाब आहे. अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.
काही महिलांचादेखील नावेमधून प्रवास
त्या लहान मुलांबरोबर काही महिलादेखील नावेमध्ये प्रवास करत होत्या. असे सांगण्यात आले आहे. आता प्रशासनामध्ये या घटनेनं खळबळ उडाली असून बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार हे मुजफ्फरनगरच्या दौऱ्यावर दाखल झाले असून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे.