नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची (Lok Sabha Elections Result 2024) अवघ्या देशाची उत्सुकता ताणली गेली आहे. आज (दि.4) मतमोजणीनंतर लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए विरुद्ध काँग्रेसच्या पुढाकाराने विरोधकांनी स्थापन केलेली इंडिया आघाडी यांच्यात प्रमुख लढत असून, एनडीए 400 पार होणार की नाही याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.
देशात सात टप्प्यांत लोकसभा निवडणूक पार पडली. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याच्या मतदानाने ही प्रक्रिया सुरू झाली ती शनिवारी 1 जून रोजी सातव्या टप्प्याच्या मतदानाने संपली. सात टप्प्यात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीच्या आधारे शनिवारी सर्वच माध्यमांनी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर केले. त्यात बहुतेक सर्वांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए 300 च्या पुढे जागा घेऊन सत्तेत येत असल्याचा अंदाज वर्तवल्याने प्रत्यक्ष निकालाबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू पुन्हा चालेल, अशी भाजपची अपेक्षा असून, भाजपच्या पुढाकाराने एनडीए ही निवडणूक लढवत आहे. मागील दहा वर्षांतील कामे आणि उज्ज्वल भारताची पायाभरणी हे दोन मुद्दे घेत एनडीएने प्रचाराची रणधुमाळी गाजवली.
सकाळी आठपासून मतमोजणी
दीड महिन्याच्या घमासान प्रचारानंतर व सर्व मतदान पूर्ण झाल्यानंतर आता देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. मंगळवारी 4 जून रोजी सकाळी 8 वाजता देशात एकाच वेळी 543 मतदारसंघांत मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. साधारणपणे 10 वाजेनंतर कल मिळायला लागतील व दुपारी उशिरा निकाल हाती येण्याची शक्यता आहे.