Threat-email : सोमनाथ मंदिर, गुजरातमधील भाजप कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी, सर्च ऑपरेशन करताच निघाला फुसका बार! सौजन्य : आयएएनएस
जगप्रसिद्ध सोमनाथ मंदिर आणि अहमदाबाद व गांधीनगरस्थित भाजप कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी सोमवारी एका ई-मेलद्वारे (Threat-email)देण्यात आली. हा धमकीचा मेल येताच गुजरातमध्ये सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आला. दरम्यान, पोलिसांना शोधकार्यात काहीच हाती लागले नाही.
पोलीस प्रशासनाला धमकिची माहिती मिळताच बॉम्ब डिटेक्शन, डिफ्यूज टिम आणि डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून शोध मोहिम हाती घेण्यात आली. धमकीत अहमदाबादच्या खानपुर परिसरातील भाजप कार्यालय, गांधीनगरच्या कोबास्थित पक्षाचे राज्य कार्यालय कमलम आणि सोमनाथ मंदिराचा उल्लेख करण्यात आला होता. पोलिसांनी सांगितले की, शोधकार्यादरम्यान या ठिकाणी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
अहमदाबाद सी-डिव्हिजनचे एसीपी अद्वैत गांधी यांनी सांगितले की, गांधीनगर स्थित राज्य गुप्त विभागाला सकाळी 9 वाजता याबाबत सूचना प्राप्त झाली, ज्यानंतर खानपुर स्थित भाजप कार्यालयात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. यावेळी आम्ही अतिरिक्त पोलीस दलही तैनात केले होते.
गांधी यांनी स्पष्ट केले की, सोमनाथ मंदीर आणि कोबा येथील भाजप कार्यालयाचा देखील धमकीच्या ई-मेलमध्ये उल्लेख होता. पण आम्हाला तेथेही काहीच संशयास्पद आढळले नाही. तेथील स्थिती सामान्य होती. तसेच नागरिकांनी विनाकारण घाबरू नये, पोलीस याबाबत सखोल चौकशी करत असल्याचे गांधी यांनी सांगितले.
तसं पाहता, सोमनाथ मंदिर परिसरात इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर बंदी असलेल्या वस्तू नेता येत नाहीत. मंदीरात २४ तास सुरक्षा रक्षक तैनात असतात. भाविकांची येथे दोन ठिकाणी तपासणी केली जाते. तसे असले तरी सोमनाथ येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी एम. एफ. चौधरी यांनी सांगितले की, वरिष्ठ पोलिसांच्या सूचनेनुसार आम्ही मंदिराची सुरक्षाव्यवस्था वाढवली आहे. नागरिकांनी व भाविकांनी घाबरण्याचे कारण नाही.






