नवी दिल्ली : लोकसभेच्या तारखांची घोषणा कधी होते, याबाबत प्रत्येक राजकीय पक्षासह सर्वसामान्य नागरिकालाही उत्कंठा आहे. भारतीय निवडणूक आयोग आज दुपारी तीन वाजता पत्रपरिषदेत लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करेल. यावेळी काही राज्यांच्या निवडणूक वेळापत्रकाचीदेखील घोषणा करण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रपरिषदेचे सोशल मीडियातून लाईव्ह प्रसारण होणार आहे. निवडणूक निकालाच्या तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंग संधू यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली. दोन्ही सनदी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक आयुक्तांचे यावेळी स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांनी तिसरी टर्मही आमचीच असेल, असा दावा केला आहे. तर यावेळी आम्ही मोदींना पंतप्रधान होऊ देणार नाही, असे ‘इंडिया’ आघाडीने म्हटले आहे.
गेल्यावेळी होते सात टप्पे
गेल्यावेळी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक 7 टप्प्यांत झाली होती. यावेळीही 6-7 टप्पे पाडले जाण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी 11 एप्रिल ते 19 मे या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली होती.
मतदान ईव्हीएमवर होणार
कामकाजात अनियमितता असल्याचा ठपका ठेवत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर आक्षेप घेणाऱ्या वेगवेगळ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल होत्या. त्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. लोकसभा निवडणुकांच्या घोषणेआधी निवडणूक आयोगासाठी हा मोठा दिलासा ठरला असून, निवडणुका ईव्हीएमवर घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.