संग्रहित फोटो
शिवनगर/ प्रदीप जगदाळे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नजीकच्या काळात होऊ घातली आहे. ही निवडणूक ‘ चौरंगी होणार की दुरंगी’ याबाबत खुद्द सभासदांमध्येच संभ्रमावस्था आहे. राज्यात महायुती सत्तेवर आहे. परिणामी ‘माळेगावातही महायुतीचा सूर काही जण आळवीत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांच्या मनोमिलनाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला अशी चर्चा असून, ते काय निर्णय घेणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
संपर्क दौऱ्यांमध्ये वाढ
माळेगाव कारखान्यात राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार गटाची सत्ता आहे. निवडणूकपूर्व प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, सभासद असणाऱ्या संस्थांचे ठराव मागविण्यात आले आहेत, तर ‘पॅनल प्रमुखांची वरात सभासदांच्या दारात’ पोहोचली आहे. सत्ताधारी निळकंठेश्वर पॅनलचे बाळासाहेब तावरे, केशवराव जगताप, जिल्हा बँकेचे सदस्य दत्तात्रय यांनी सभासद बैठकांवर जोर दिला आहे, तसेच सहकार बचाव पॅनलचे प्रमुख, कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे व शरद पवार गट शेतकरी बचाव पॅनलचे प्रमुख व कष्टकरी संघर्ष शेतकरी पॅनलचे प्रमुख यांनीही सभासद संपर्क दौरे वाढविले आहेत. त्यामुळे सध्यातरी कारखान्यात चौरंगी लढतीचे चित्र दिसत आहे.
माळेगावसाठी व्यूहरचना सुरू
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपने मध्यंतरी याचे बुरूज ढासळण्याच्या प्रयत्न केला; पण राज्यात निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार स्थापन झाल्याने ढासळलेले बुरूज सावरण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस प्राधान्याने करीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असणारा ‘माळेगाव’ कारखाना काढून घेण्यासाठी काही व्यूहरचना सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कारखान्यात महायुतीचे पॅनल असावे असा सूर उमटत आहे.
कोण मारणार मैदान?
माळेगाव कारखाना निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर लढायची व कशी जिंकायची, हे आता चारही मुख्य पॅनेलच्या जाहीर झालेल्या प्रचार पत्रकावरून स्पष्ट झाले. सत्ताधारी निळकंठेश्वर पॅनेलवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हात आहे, तर सहकार बचाव शेतकरी पॅनेलच्या उमेदवारांचे करता करविता हे चंद्रराव तावरे, रंजन तावरे आहेत. तर शेतकरी बचाव पॅनलला युगेंद्र पवार यांची साथ असणार आहे. त्यामुळे, या निवडणुकीत बहुमताची कामगिरी सिद्ध करण्यासाठी सत्ताधारी व विरोधक आपापली पॉवर दाखविण्यासाठी मैदानात उतरले आहेत.