Train Accident : आंध्रात एक्सप्रेसच्या धडकेत चार विद्यार्थी दगावले, श्रीकाकुलममधील ह्रदयद्रावक घटना, सौजन्य : आयएएनएस
आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यात एक्स्प्रेसच्या धडकेत (Train Accident) निष्पाप चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच यात आणखीन एक विद्यार्थी गंभीर रुपात जखमी असल्याचे कळते.
पोलिसांच्या मते, हे सर्व विद्यार्थी रुळावरून चालत होते. त्यांना अचानक आलेली राज्य राणी एक्स्प्रेस दृष्टीस पडली नाही. ज्यामुळे हा अपघात झाला. मृतांमध्ये विशाखा राव, दिलीप कुमार, शिवा आणि शरथ कुमार यांचा समावेश आहे. ते नौपाडावरून टेक्कालीच्या दिशेने रुळावरून चालत जात होते.
टेक्कालीचे रेव्हेनू डिव्हिजनल अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव सैल्मन राजू आहे. त्याच्यावर टेक्कालीच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील मृत विद्यार्थी इंटमीडिएट (अकरावी आणि बारावी) मध्ये शिक्षण घेत होते. त्यांचे वय 16 ते 17 वर्षांचे होते. या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून तपास सुरू झाल्याची माहिती येथील पोलीस अधिक्षकांनी दिली.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी चार विद्यार्थ्यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली. त्यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती घेतली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, या विद्यार्थ्यांना एक्सप्रेस आपल्या दिशेने येत असल्याचे कळलेच नाही. त्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रथम दर्शनी तरी वाटत आहे.
मुख्यमंत्र्यांनी मृत विद्यार्थ्यांसाठी मदत जाहीर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असून जखमी विद्यार्थ्याचा खर्च करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी देखील या ट्रेन अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे.






