भारत-पाक युद्धबंदीवरून डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी; म्हणाले, मी मध्यस्थी केलीच नाही, पण...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्धबंदीची घोषणा सर्वप्रथम केल्याचा दावा केला होता. त्यावरून भारतात वादंग उठलं आहे. विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला यावरून घेरलं असतानाच ट्रम्प यांनी आपल्या विधानावरू पलटी मारली आहे. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी मदत केली होती, पण थेट मध्यस्थी केली नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.
म्प म्हणाले की, मी असे म्हणत नाही की मी मध्यस्थी केली, परंतु गेल्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी धोकादायक स्थितीवर पोहोचला होता. तो तणाव निवळण्यासाठी मतद केली. १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केली. ट्रम्प यांनी याबद्दल ट्विट केले होते. त्यांनी म्हटले होते की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे, हे जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे. समजूतदारपणा दाखवल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन तरत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
व्यापार थांबवण्याची धमकी देऊन भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी घडवून आणण्यास मदत केल्याचा ट्रम्प यांचा दावाही भारत सरकारने फेटाळला आहे. पाकिस्तानसोबतच्या लष्करी तणावादरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यातील कोणत्याही चर्चेदरम्यान व्यापाराचा मुद्दा उपस्थित झाला नाही, असे सरकारने स्पष्टपणे सांगितले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टिप्पण्यांवरील माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की ‘पाकिस्तानसोबतच्या तणावपूर्ण संघर्षादरम्यान भारत आणि अमेरिकेचे नेतृत्व संपर्कात होते, परंतु व्यापारावर कोणतीही चर्चा झाली नाही.
परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून १० मे रोजी गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याच्या करारापर्यंत, उदयोन्मुख लष्करी परिस्थितीवर भारतीय आणि अमेरिकन नेत्यांमध्ये चर्चा झाली. कोणत्याही चर्चेत व्यापाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला नाही. भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्याचे श्रेय ट्रम्प यांनी घेतल्यानंतर या टिप्पण्या आल्या. ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की त्यांच्या प्रशासनाने दोन्ही देशांमधील पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीची मध्यस्थी केली. ट्रम्प यांनी दावा केला की त्यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांना सांगितले की जर ते युद्धबंदीवर सहमत असतील तर अमेरिका त्यांना व्यापारात मदत करेल आणि जर ते सहमत झाले नाहीत तर त्यांच्यासोबत कोणताही व्यापार केला जाणार नाही. यानंतर दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली.